वर्धा - कोविड-१९ हा विषाणू आपल्यासोबत बराच काळ, सदैव राहील का? ही बाब विषाणू स्वत: निश्चित करीत असतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. हे जगभरातील तज्ज्ञांनी बºयाच कोरोनासदंर्भात केलेल्या दीर्घ अभ्यासावरून दिसून येते. असे मत येथील न्यायवैद्यक विभागाचे प्रा.डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी मांडले आहे.
तज्ज्ञांच्या मते यापूर्वी येऊन गेलेल्या चारपेक्षा अधिक कोरोना विषाणू, स्वाईन फ्लू तसेच इतर मानवी श्वसनजन्य विषाणूंसोबत आपण जगणे शिकलो आहोतच. त्यामुळे या सोबत जगणेही शिकावे लागेल. या संदर्भात दाखला देताना हार्वर्ड एपिडेमिओलॉजीचे प्रा. मार्क लिपिसिच यांच्या विधानाचा डॉ. खांडेकर यांनी संदर्भ दिला आहे. मार्क लिपिसिच यांनी येत्या वर्षभरात जगभरातील जवळपास ४० ते ७० टक्के लोकांना कोविड-१९ विषाणूची लागण होईल असे सांगितले, पण ते म्हणतात की मात्र, याचा अर्थ असा नाही की, सर्वांना गंभीर आजार होतील. बहुधा अनेकांना सौम्य आजार असेल किंवा कुठलीही लक्षणे नसतील; पण हा विषाणू सर्वत्र पसरतच जाईल. जागतिक आरोग्य संघटनेनुसार तसेच ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित अहवालानुसार कोविड-१९ विषाणूची लागण झालेल्या ८० टक्के लोकांना कुठलीही लक्षणे नाहीत.
इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक बलराम भार्गव यांनीसुद्धा यावर असेच भाष्य केले आहे. असा दावा डॉ. खांडेकर यांनी केला आहे. लान्सेट या आरोग्य पत्रिकेमध्ये २९ फेब्रुवारी २०२० ला प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार लक्षणे नसलेल्या कोविड १९ रुग्णांचा आधीच खूप फैलाव (निर्यात) झाला असल्यामुळे जागतिकस्तरावर मोठ्या शहरांमध्ये कोविड-१९ चा स्वतंत्र स्वावलंबी उद्रेक अपरिहार्य होऊ शकतो. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये म्हटले आहे की, अशी लक्षणे नसलेल्या कोविड-१९ व्यक्ती १० टक्के जरी बाहेर असतील तर याचा अर्थ असा की, हा विषाणू सर्वत्र आहे.
यामुळे आपण जेव्हापासून समजत होतो, त्याच्या खूप पूर्वीपासूनच हा विषाणू लोकांमध्ये फिरत होता आणि त्यामुळे खूप मोठ्या लोकसंख्येला याची आधीच लागण झाली असेल, ही शक्यता नाकारता येत आहे. लक्षणे नसलेल्या कोविड-१९ रुग्णांना, लोकांना एवढ्या जास्त लोकसंख्येमधून ओळखणे व त्यांना विलगीकरण करणे हे आपल्यासारखी मोठी लोकसंख्या असलेल्या देशातील यंत्रणेला खूप कठीणच नाही तर अशक्य आहे. तज्ज्ञांच्या मते अशी लक्षणे नसलेल्या कोविड-१९ व्यक्ती पहिली नोंद होण्याच्या आधीच सर्वत्र पसरलेल्या असतात. जे विषाणू जास्त लोकांमध्ये लक्षणे निर्माण करत नाहीत किंवा कमी लक्षणे निर्माण करतात, त्या विषाणूचा फैलाव होतच राहतो. तज्ज्ञांच्या मते, बहुदा कोविड-१९ हा याआधी अस्तित्वात असलेल्या मानवी श्वसनजन्य विषाणूच्या संचाचा एक कायमचा भाग होईल.
आधीपासून अस्तित्वात असलेल्या चार कोरोना विषाणूसाठी अजूनही लोकांना दीर्घकाळ टिकणारी प्रतिकारशक्ती विकसित झाली नाही. जर कोविड-१९ ने या आधी आलेल्या कोरोना विषाणूचे अनुसरण केले व आता जसा फैलाव होत आहे तसाच फैलाव झाला तर आपला कोल्ड आणि फ्लू सिझन कोल्ड आणि फ्लू आणि कोविड-१९ सिझन होऊ शकतो, असे तज्ज्ञांना वाटते. यावरून हा अंदाज बांधता येऊ शकतो की कोरोना व्हायरस येथे राहण्यासाठी आला आहे. म्हणून आपण याआधी येऊन गेलेल्या चारपेक्षा जास्त कोरोना विषाणू तसेच स्वाईन फ्लू व इतर मानवी श्वसनजन्य विषाणूसोबत जसे जगायला शिकलो, तसेच यासोबतही आता जगणे शिकावे लागेल, असे तज्ज्ञांना वाटते.
यापूर्वी आलेल्या साथींचा जर अभ्यास केला तर तज्ज्ञांच्या मते साथीच्या विषाणूंनी आपल्यासोबत किती काळ राहावे याची वेळ विषाणू स्वत: निश्चित करीत असतो;.दुदैवाने आपण नाही असेही डॉ. इंद्रजीत खांडेकर यांनी म्हटले आहे.