लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाचा प्रकोप वाढताना दिसताच संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने १५ एप्रिलपासून राज्यात संचारबंदी लागू केली. या संचारबंदीच्या काळात रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता वर्तविली जात होती; पण या संचारबंदीच्या काळात रुग्णसंख्या दुपटीने वाढली असून गेल्या पंधरा दिवसात तब्बल १२ हजार ८९० रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने यंत्रणेवरील ताणही वाढतच आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने सर्वत्रच हाहाकार माजविला आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्येसह मृत्यूचे प्रमाणही दुप्पट झाले आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत राज्यात संचारबंदी लागू केली. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिलेत. तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी विवाह समारंभासह इतर कार्यक्रमांच्या उपस्थितीवरही निर्बंध आहेत. तसेच जिल्ह्यातील दुकानांच्या वेळाही सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत करण्यात आल्या आहेत. प्रशासनासह शासनाकडून प्रभावी उपाययोजना होत असल्याने या संचारबंदीच्या काळात रुग्णसंख्या कमी होणे अपेक्षित होते; मात्र या कालावधीत रुग्ण दुपटीने वाढले आहे. एप्रिल महिन्यात तब्बल १ लाख ५ हजार २५२ चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये १८ हजार ७५७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. विशेषत: महिनाभरात १२ हजार २५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून कोरोनाच्या पॉझिटिव्हीटी रेटपेक्षा कोरोनामुक्तीचा रेट ‘हाय’ आहे. ही बाब वर्धेकरांसाठी समाधानकारक मानावी लागेल.
या तीन कारणांमुळे रुग्णसंख्या वाढली
- संचारबंदीच्या काळात आरोग्य विभागाकडून ‘ट्रेस, टेस्ट व ट्रीट’ या त्रिसूत्रीवर भर देऊन चाचण्यांचे प्रमाण वाढविले. संचारबंदीच्या काळात दुप्पट कोरोना चाचण्या करण्यात आल्या.
- आरोग्य विभागाकडून नागरिकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये इतर आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांचा डाटा गोळा केला होता; पण त्यानंतर आरोग्य विभागाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने कोरोनाने झडप घातली.
- संचारबंदी असली तरीही अत्यावश्यक सोयी-सुविधांची दुकाने सुरु आहेत. त्यामुळे नागरिक त्याचाच आधार घेत गर्दी करीत आहेत. बऱ्याच भागात आठवडी बाजार सुरू असल्याने रुग्णसंख्या वाढीस कारण ठरत आहे.
ग्रामीण भागांत रुग्ण वाढले
पहिल्या टप्प्यात शहरी भागात रुग्णांची संख्या अधिक होती. पण, आता दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने ग्रामीण भागाला लक्ष्य केले आहे. ग्रामीण भागातील नागरिक कोरोना चाचणीच्या धाकाने दवाखान्यात न जाता घरीच आजारपण अंगावर काढत आहेत. परिणामी एकाला बाधा झाल्यास परिवारातील सर्वच सदस्य कोरोनाबाधित येत आहेत. यासोबतच शासनाच्या नियमावलींनाही बगल दिली जात आहे. लग्नसोहळ्यासह इतरही कार्यक्रमांना उपस्थिती लावली जात असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.