लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : पाठ्यपुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मतारीख आणि तोरणा किल्ला जिंकल्याचे वर्ष ही माहिती चुकीची असल्याने चूक दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यासाठी क्षत्रिय मराठा परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले.न्यू सरस्वती हाऊस (इंडिया) प्रा. लि. नवी दिल्ली येथील प्रकाशनाने सीबीएसई शाळेच्या अभ्यासक्रमात वर्ग ५ वी च्या मराठी सप्तरंग पाठ्यपुस्तकात पाठ क्रमांक ११ हा देशातीलच नव्हे, तर जगातील आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मतारीख १९ फेब्रुवारी १६२७ (तारखेनुसार) अशी लिहिलेली आहे. तसेच वयाच्या २० व्या वर्षी तोरणा किल्ला ताब्यात घेतल्याचा उल्लेख आहे. वास्तविक या दोन्ही बाबी चुकीच्या आहेत.महाराष्ट्र शासनाच्या राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणेद्वारे प्रकाशित वर्ग ४ च्या पाठ्यपुस्तकात पाठ क्रमांक ४ मधील पान क्रमांक १३ वर आणि वर्ग ७ वी च्या पुस्तकात पाठ क्रमांक ५ पान क्रमांक १९ वर लोककल्याणकारी राजा शिवछत्रपती यांची जन्मतारीख १९ फेब्रुवारी १६३० अशी नमूद आहे. एवढेच नव्हे, तर महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या समितीद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख १९ फेब्रुवारी १६३० अशीच जाहीर करण्यात आली आहे. तोरणा किल्ला वयाच्या १६ व्या वर्षी आपल्या सवंगड्यांसह जिंकल्याचा उल्लेख ‘रयतेचा राजा शिवछत्रपती’ लेखक डॉ. पी.एस.जगताप या पुस्तकात पान क्रमांक ४२ वर १६४६ असा उल्लेख आहे. तसेच गुगलवरदेखील हेच वर्ष आहेत. प्रकाशनाने नव्या शैक्षणिक सत्रासाठी पुस्तके शाळेला वितरित करून महाराजांचा चुकीचा इतिहास मांडण्याची गंभीर चूक केलेली आहे. शासनाने या पुस्तकांचे वितरण थांबवावे आणि चूक दुरूस्ती करण्यासाठी प्रकाशनाला बाध्य करावे, अशी मागणी परिषदचे अध्यक्ष प्रमोद खंडागळे, उपाध्यक्ष संदीप भांडवलकर, प्रा.सुनील अंभोरे, अॅड. गजेंद्र जाचक, मनोज चांदूरकर, सुधीर पांगुळ, प्रशांत वाकचौरे, अजय मापारी, दीपक कदम, अर्चित निघडे, नितीन शिंदे, बादल रोकडे, दिलीप इंगळे आदींनी केली आहे.
पाठ्यपुस्तकातील ‘ती’ चूक दुरूस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 8:36 PM
पाठ्यपुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मतारीख आणि तोरणा किल्ला जिंकल्याचे वर्ष ही माहिती चुकीची असल्याने चूक दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यासाठी क्षत्रिय मराठा परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले.
ठळक मुद्देक्षत्रिय मराठा परिषदेची मागणी : मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना निवेदन