आर्वी (वर्धा) : मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यात व उपमुख्यमंत्र्यांच्या पालक जिल्ह्यातील आर्वी नगरपालिकेत भ्रष्टाचार उफाळून आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे असंघटित कामगार जिल्हाध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना प्रतीकात्मक नवरदेव बनवून शहरातून वाजतगाजत वरात काढली. तसेच भ्रष्टाचार करणाऱ्यांना फटके द्यावे म्हणून स्वतःलाच चाबकाने फटके मारून प्रशासनाचे लक्ष वेधले.
ही वरात नगरपालिकेवर धकडल्यावर मुख्याधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. घनकचरा संकलन, वाहतूक, वर्गीकरण व प्रक्रिया प्रकल्पाच्या कंत्राटातून खतनिर्मिती, कचरा निर्मूलन आदी कामे होत नसतानाही कोट्यवधीचा भ्रष्टाचार करण्यात आला. याला जबाबदार असलेल्या अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदाराकडून ही रक्कम वसूल करावी. स्वतः च्या आर्थिक हितासाठी निविदा प्रक्रियेपासून देयक अदा करण्यापर्यंत मोठ्या प्रमाणात अनियमितता करून शासन, प्रशासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे जबाबदार अधिकारी, कर्मचारी यांच्या सर्व्हिस बुकावर या भ्रष्टाचाराची नोंद घेऊन त्यांना कायमस्वरूपी सक्तीच्या रजेवर पाठवावे. मनुष्यबळ पुरवठा कंत्राटात कामगारांची आर्थिक पिळवणूक होत आहे. सर्व काम दोषपूर्ण असून शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे.
जिल्हाध्यक्ष दिलीप पोटफोडे यांनी दोषींवर कायद्याचे चाबूक द्या धडा शिकवा, या मागणीसाठी स्वतःला चाबकाचे फटके दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा शुभांगी कलोडे, विधानसभा अध्यक्षा प्रमिला हत्तीमारे, रेखा वानखेडे, माधुरी सपकाळ, सरिता धनगर, सलमा मुस्ताक शहा, कमलेश चिंधेकर, सुरेंद्र वाटकर, राजानंद वानखडे, शंकर हत्तीमारे, बादल काळे, प्रतीक खांडेकर, प्रज्वल उईके, चंद्रभान चौगुले यांच्यासह सर्व सेल व महिला आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.