पुलगावातील शेतकऱ्यांना दिलासा वर्धा : पुलगाव येथील साईकृपा कॉटस्पीन येथे शनिवारी कापूस काढणी पश्चात तंत्रज्ञान विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. बायर क्रॉप सायन्स व कान्फेडरेशन आॅफ इंडियन टेक्स्टाईल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्शशाळा घेण्यात आली. याप्रसंगी कापूस घेऊन आलेल्या शेतकऱ्याला रूईच्या आधारावर ६ हजार रुपये प्रती क्विंटल भाव देण्यात आला. कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय कृषी अनुसंधान संस्था जीटीसी नागपूरचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. एस. के. शुक्ला, जाफर खान, मोहन बर्डे तर मार्गदर्शक म्हणून कापूस विकास व संशोधन केंद्राचे प्रकल्प समन्वयक जी.एच. वैराळे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. शुक्ला यांनी कापसाच्या प्रतीवर कापसाचे दर अवलंबून असतात. अधिक रूई असलेल्या कापसाला अधिक भाव मिळाले पाहिजे, असे सांगितले. डॉ. वैराळे यांनी वर्धा जिल्ह्यात कान्फेडरेशन आॅफ इंडियन टेक्स्टाईल इंडस्ट्री व कापूस विकास व संशोधन संस्था मुंबईद्वारे राबविण्यात येत असलेल्या कापूस पथदर्शी प्रकल्पाबाबत माहिती दिली. वर्धा जिल्ह्यातील ७ हजार ५०० कापूस उत्पादकांचा यात समावेश असून कापूस उत्पादन खर्च कमी कसा होईल, प्रती एकरी उत्पादन कसे वाढविता येईल, यासाठी आयसीएआर व कृषी विभाग तसेच अन्य संस्थांचे सहकार्य लाभले आहे. शेतकऱ्यांना आयसीएआरचे कापूस तंत्रज्ञान व्हॉईस मॅसेजद्वारे मार्गदर्शन करण्यात येते. कापसाची किंमत ही रूईच्या टक्केवारीच्या आधारे ठरणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यशाळेदरम्यान, कापूस घेऊन येणाऱ्या सुमीत प्रकाशराव सुरसे रा. कवठा या शेतकऱ्याला रूईच्या टक्केवारीनुसार कापसाचे दर देण्यात आले. या शेतकऱ्याच्या एक किलो कापसामध्ये रूईचे प्रमाण ४० टक्के आढळल्याने ६ हजार रुपये भाव देण्यात आला. याप्रसंगी सदर शेतकऱ्याचा सत्कारही करण्यात आला. कापूस पथदर्शी प्रकल्पांतर्गत पार पडलेल्या या कार्यशाळेमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)
कापसाला मिळाला सहा हजार रुपये भाव
By admin | Published: January 08, 2017 12:45 AM