लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दुप्पट भाव देण्याच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. पण, यावर्षीच्या जागतिक मंदिमुळे मिळालेला कमी दर आणि त्यात कोरोना संकटाची भर पडल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल भावात कापूस विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे देशातील कापूस उत्पादकांना तब्बल २६ हजार कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागला, अशी खंत शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रातून व्यक्त केली आहे.
पंतप्रधानांच्या घोषणेनुसार २०१८-१९ मध्ये कापूस उत्पादकांनी ६ हजार २०० ते ६ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस विकणे अपेक्षित होते. पण, भारतातील कापूस व सुताची निर्यात घटली आहे. अमेरिकेच्या न्युयॉर्क कापूस बाजारात ८० ते ८५ सेंट प्रतिपाउण्ड रुईचे दर ६० ते ६५ सेंट प्रतिपाउण्डपर्यंत पडले आहेत. भारतीय बाजारातही रुईच्या गाठींचे दर ४२ हजार ते ४५ हजार प्रती खंडीवरून ३४ हजार ते ३६ हजार प्रती खंडीवर आले आहे. २५ मार्चच्या लॉकडाऊनपूर्वी व्यापारी शेतकऱ्यांकडून ५ हजार १०० ते ५ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची खरेदी करीत होते. आता व्यापारी केवळ ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची खरेदी करीत आहेत. आज कापूस उत्पादकांना १ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल कमी दराने कापूस विकण्याची वेळ आली. २०१९-२० मध्ये देशभरात ३ कोटी ५० लाख गाठींचे उत्पादन झाल्याचा अंदाज आहे.
एका गाठीकरिता ५ क्विंटल कापसाची आवश्यकता असते. त्यामुळे कापूस उत्पादकाला एका गाठीमागे ७ हजार ५०० रुपये कमी मिळाले आहेत. देशातील ३ कोटी ५० लाख गाठींच्या उत्पादनाचा विचार केल्यास २६ हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. अशातच आता उत्पादन खर्चही वाढल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार तरी कसे? असा प्रश्नही जावंधिया यांनी उपस्थित केला आहे.