वर्धा : विदर्भाचे पांढरे सोने अशी ओळख असलेल्या कापसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. कुठे एक तर, कुठे दोनच वेच्यात उलंगवाडी झाल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. यात खर्चही निघाला नसल्याने आर्थिक घडी विस्कटल्याची चिंता कास्तकारांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.
कापूस हा विदर्भ पट्ट्यातील प्रमुख पीक मानला जात आहे; पण गेल्या काही वर्षांपासून सरकी आणि रोग यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. नवे नवे संकट त्याचा पिच्छा सोडायला तयार नाही. शेतीशिवाय पर्याय नाही. देशाचा आर्थिक कणा शेती नी कास्तकार असताना पद्धतशीरपणे देशोधडीला लावण्याचा कुटिल डाव दिसून येत आहे; पण मार्ग नसल्याने शेतीशिवाय करणार तरी काय? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे, हे मात्र खरे. ज्या कापसाने तारले तोच आज अडचणींचा ठरत आहे. सेवाग्राम ते हमदापूर या पट्ट्यात अशी विदारक स्थिती पाहावयास मिळत आहे.
चानकी येथील अरविंद पन्नासे यांची दोनच वेच्यातच उलंगवाडी झाली. एकरी एवरेच चार ते पाच असा आहे. अशीच काहीशी स्थिती पंढरीनाथ राऊत, गणेश राऊत, माणिक ढुमने तसेच भोसा येथील गणेश कोचे यांची आठ एकरात पराटी होती. एकच वेचा झाला. पात्या आहे, पण बोंडाचा पत्ताच नाही. बोंड अळीचीही शक्यता वर्तविली आहे.
कापूस वेच्याचे वेगवेगळ्या ठिकाणी १५० ते २०० मनकी असा भाव सुरू आहे. यातही वेचाच होत नसल्याने काही वाढून द्या, अशी गळ मजूर घालीत आहेत. कापसाला भाव बरा आहे; पण उत्पादनच कमी असल्याने भाव राहून फरक काय पडणार. एवढी मेहनत आणि पैसा मातीत घालून हातात काय येणार हा प्रश्र्न अनुत्तरित आहेत.
शेतकरी कठानाची तयारी करीत आहेत. यात सेवाग्राम ते हमदापूरपर्यंत उपकालवे, पाटसऱ्या आहेत. शेतकऱ्यांना पाणी मिळाल्यास रब्बीसाठी फायदा. होणार यात शंका नसून या वेळी तर दोन्ही धरणे फुल्ल आहे आणि पाणी सोडणार; पण उपकालवे व पाटसऱ्यांची अवस्था वाईट आहे. खोलीकरण आणि झुडपे काढणे, बांधा टाकते अशी कामे पावसाळा संपल्याबरोबर करणे आवश्यक आहे. पण अद्यापही झालेले नसल्याने पाणी चक्क सैरावैरा पळते. यात वाया जाणे, नाले भरणे, शेताचे नुकसान होण्याचे प्रकार घडतात, अशी माहिती देऊळगावचे सरपंच अश्वजित चाटे, चानकीचे माजी ग्रामपंचायत सदस्य अरविंद पन्नासे, बोंडसूला येथील दिलीप जरोदे यांनी दिली असून, तत्काळ व्यवस्था करण्याची मागणी केलेली आहे.