शेतकरी हवालदिल : वादळी पावसाचा पिकांना फटकासेलगाव (लवणे) : निसर्गाच्या लहरीपणाच्या फटक्यामुळे यंदाचा हंगामात शेतकरी त्रस्त आहे. अशात गत दोन दिवसांपासून परिसरात वादळी पावसाने थैमान घातल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. या पावसामुळे परिसरातील कपाशी, सोयाबीनचे पीक जमीनदोस्त झाले आहे. परिसरातील जऊरवाडा, धर्ती, बोरी, खैरी, चंदेवाणी, परसोडी, काकडा, सेलगाव या गावांना वादळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. यात काही गावात पावसाचे प्रमाण कमी असून वादळ मात्र अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कापूस पीक जमीनदोस्त झाले. यामुळे उत्पन्न येण्याची कुठलीही हमी शेतकऱ्यांना राहिली नाही. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या भागातील पिकांची पाहणी करून त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे महत्त्वाचे व आधार देणारी कपाशी जमीनदोस्त झाल्याने बळीराजा चिंतेत आहे. दिवाळीच्या तोंडावर कापूस घेण्याचे त्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. वादळी पावसाने सेलगाव येथील सुनील भूत यांच्या घरावरील टिनपत्रे उडाली व घरांच्या भिंतीही कोसळल्या. त्यामुळे त्यांच्या राहण्याची व्यवस्था ग्रा.पं.ने समाज मंदिरात केली. येथील तलाठ्याने घराची पाहणी करून त्यांना शासकीय मदत मिळावी याकरिता अहवाल तयार करून तो वरिष्ठांकडे पाठविणार असल्याचे सांगितले.(वार्ताहर)
कापूस, सोयाबीन जमीनदोस्त
By admin | Published: October 06, 2014 11:16 PM