नुकसानाची शक्यता : शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे वर्धा : कापूस वेचनीचा हंगाम जोमात सुरू आहे. शेतकऱ्यांचा कापूस घरी येत असून बहुतांश शेतकरी आपला कापूस मिळेल त्या वाहनांतून कृषी उत्पन्न बाजार समिती, जिनिंग वा अन्य व्यापाऱ्यांकडे घेऊन जातात; पण यात कमी वाहतूक भाडे आकारून ‘अनरजिस्टर्ड’ वाहने कापसाची वाहतूक करीत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याकडे लक्ष देत संबंधित विभागाने लक्ष देत कार्यवाही करणे व शेतकऱ्यांनीही काळजी घेणे गरजेचे झाले आहे. सध्या कापूस वेचनीचा हंगाम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पहिली वेचनी आटोपली असून आणखी वेचनीची कामे हाती घेण्यात आली आहेत. वेचलेला कापूस शेतकऱ्यांकडून विक्रीसाठी नेला जात आहे. यात शेतकऱ्यांना वाहतुकीचा मोठा खर्च करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. हा खर्च कसा कमी करता येईल, याचा विचार शेतकरी करीत असतात. नेमका याचाच फायदा घेत मालवाहु वाहन धारक शेतकऱ्यांना कुठलीही वाहने उपलब्ध करून देत त्यांना धोक्यात घालत असल्याचे दिसते. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कुठलेही नवीन वाहन खरेदी केल्यानंतर त्याची उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामध्ये नोंदणी करणे अनिवार्य असते. नोंदणी होईस्तोवर या वाहनांना विमा वा अन्य परवाने लागू होत नाहीत. वाहनांचा क्रमांक आणि नोंदणी झाल्याबाबत वाहनाचे आरसी बुक प्राप्त झाल्यानंतर वाहतूक परवाना लागू होतो; पण जिल्ह्यात बहुतांश मालवाहु वाहने वाहतूक परवाना मिळण्यापूर्वीच माल वाहतुकीस प्रारंभ करीत असल्याचे आढळून आले आहे. वाहन खरेदी केल्यानंतर लगेच ते कामी लावले जात असल्याने या प्रकारांत वाढ झाली आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मोठ्या संख्येने मालवाहु वाहनांतून शेतकऱ्यांना कापूस आणला जात आहे. यातील अर्ध्यापेक्षा जास्त वाहने विना क्रमांकाची, नवीन आणि वाहतूक परवाना नसलेली आढळून येतात. ही बाब शेतकऱ्यांसाठीच नुकसानदायक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाहतूक परवाना नसलेल्या विना क्रमांकाच्या वाहनांना अपघात झाला तर त्यांना कुठल्याही प्रकारचे विम्याचे संरक्षण मिळत नाही. शिवाय वाहतूक परवाना नसल्याने उलट वाहन धारकांवरच कारवाईची तरतूद असते. यात वाहनात भरलेल्या कापसालाही कुठलेच संरक्षण मिळत नाही. यात वाहन धारकासह शेतकऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामुळे शेतकऱ्यांनी वाहतूक करताना काळजी घेणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी) वाहतूक पोलीस व आरटीओने लक्ष देणे गरजेचे वाहतुकीचा परवाना नसलेल्या वाहनांना कुठल्याही प्रकारच्या सवलती प्राप्त होत नाहीत. परवाना असलेल्या वाहनांनाच वातूक करता येते. असे असले तरी क्रमांक नसलेली आणि परवाना प्राप्त व्हायची असलेल्या वाहनांतूनही मोठ्या प्रमाणात माल वाहून नेला जात असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार कापसाच्या वाहतुकीमध्ये अधिक घडत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना वाहतुकीचा खर्च कमी करायचा असतो आणि वाहनांच्या परवान्याबाबत तितकीसी माहिती नसते. नेमका याचाच फायदा घेत हा प्रकार केला जात असल्याचे दिसते. वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे. अपघात झाल्यास भरपाईची शाश्वती नाही कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खासगी व्यापाऱ्यांकडे येत असलेला कापूस क्रमांक प्राप्त नसलेल्या आणि परवाना नसलेल्या वाहनांतून आणला जात असल्याचे दिसून येते. या वाहनांना प्रसंगी अपघात झाला तर त्यातील मालाची भरपाई मिळणे दुरापास्त होते. शेतकऱ्यांची याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे.
‘अनरजिस्टर्ड’ वाहनांतून कापसाची वाहतूक
By admin | Published: January 01, 2017 2:04 AM