लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वातावरणात होत असलेला बदल आणि व्हायरलमुळे सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखीचे रुग्ण वाढत आहेत. यावरील उपायांसाठी डॉक्टरकडे जाण्यासोबतच अनेकजण आजीबाईचा बटवा वापरत आहेत. असे असले तरी वातावरणाच्या बदलाचा आरोग्यावर परिणाम होतोच. कुणाला ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यासारखा त्रास उद्भवतो. अनेक जण याला आजार समजून डाॅक्टरकडे उपचारासाठी जातात; परंतु हा आजार नसून नैसर्गिक बदल आहे. त्यामुळे आपल्या शरीराला वातावरणाशी जुळवून घेताना थोडा त्रास होतो. शरीराच्या तापमानात वाढ होते, शरीरांचे स्नायू दुखतात व सर्दी-खोकला जाणवतो. तसेच वातावरण बदलामध्ये टाॅन्सीलचा त्रास वाढतो, अशा वेळेस बाभळीच्या सालीचा काढा बनवून त्यात काळे मीठ टाकून त्या पाण्याच्या गुळण्या केल्यास टाॅन्सीलचा त्रास कमी होतो. वातावरण बदलामुळे होणाऱ्या खोकल्याचा त्रास कमी करण्याकरिता ज्येष्ठमधाचा एक छोटा तुकडा तोंडात ठेवल्यास खोकल्याचा त्रास होणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. एकदा शरीर वातावरणाशी एकरूप झाले की आपोआपच त्रास कमी होतो. ज्यांच्या शरीरात रोगप्रतीकारक शक्ती कमी असते त्यांच्यावर वातावरणीय बदलाचा परिणाम लवकर होतो. या त्रासापासून सुटका मिळवायची असल्यास अगदी साध्या उपायांनी आपण यावर मात करू शकतो. याकरिता आपल्या आजीने सांगितलेले उपाय हमखास उपयोगाचे ठरतात. आपल्या स्वयंपाकघरातील अनेक वनस्पतींचा याकरिता उपयोग होतो.अद्रक, हळद, तुळस, काळी मिरी, लवंग, गवती चहा आदी औषधी पदार्थांचा उपयोग करून सर्दी, ताप, खोकला यावर उपाय करू शकतो.
काय म्हणतात तज्ज्ञ
घरगुती उपायांमुळे साईड इफेक्ट्स होण्याची भीती राहत नाही, असे म्हटले जाते; परंतु खूप दिवसाचा खोकला असेल आणि त्यासाठी घरगुती उपाय करीत असाल तर तो धोकादायक ठरू शकतो. प्रत्येकाची शरीररचना वेगवेगळी असते. आजाराची गंभीरता वेगळी असते. यामुळे कोणत्या घरगुती उपचाराचा फायदा होईल, याचा सल्ला आयुर्वेदिक तज्ज्ञांकडून घ्यायला हवा. यामुळे दुष्परिणाम टाळणे शक्य आहे.- डॉ. पवन भोयर,आयुर्वेदिक तज्ज्ञ
दूध आणि हळद मुलांना हळदयुक्त दुध दिल्यास त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढते व सर्दी, खोकल्यासारखे आजार होत नाहीत. हळद ही अँटिबायोटिक असल्यामुळे शरीरातील अनावश्यक विषाणूंचा नाश करते. म्हणूनच हळदीचे आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे.
आल्याचा चहाआपण चहामध्ये आल्याचा हमखास उपयोग करतो. आले सर्दी खोकला या आजारांवर अत्यंत उपयोगी आहे. आल्यातील औषधीय गुणांमुळे आयुर्वेदात फार महत्त्व आहे. त्यामुळे पावसाळा आणि हिवाळ्यात आल्याचा चहा गुणकारी ठरतो.
तुळशीची पाने आणि मध तुळशीच्या पानांचा रस व मध कफावर अत्यंत गुणकारी आहे. वातावरण बदलामुळे कफ वाढतो. त्यासाठी तुळशीच्या पानांचा रस मधातून घेतल्यास कफ पातळ होऊन आराम मिळतो. तुळसी, आलं आणि मधही एकत्र करुन चाटन दिले जाते.
लिंबू आणी मध कोमट पाण्यातून लिंबूचा रस आणि मध रोज सकाळी घेतल्यास पोटातील इन्फेक्शन दूर होते. पोट साफ होते व लिव्हरसंबंधी तक्रारी दूर होतात. अपचन होणे, पोट साफ न होणे या तक्रारी असल्यास रोज सकाळी कोमट पाण्यात मध, लिंबाचा रस प्यावा.