वर्धा: अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर मातृत्व लादणाऱ्या नराधमास दहा वर्षाचा सश्रम कारावास सुनावण्यात आला. हा निर्वाळा अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही.टी.सूर्यवंशी यांनी दिला. सुनील रवि सोमकुवर (२८) असे आरोपीचे नाव असून आरोपी व पीडिता यांच्यातील ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. ८ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी साडेअकरा वाजता आरोपीने पीडितेला फोन करुन तुझ्या वडीलांनी आपल्या लग्नाला विरोध केला आहे.
त्यामुळे आपण दोघेही पळून जावू असे सांगितले. त्यानुसार दोघेही गावातील नदीवर भेटले. तेथून दुचाकीने अमरावती येथील सुनीलच्या नातेवाईकाकडे गेले. पीडितेचे वडील घरी आल्यानंतर ती घरी दिसली नसल्याने त्यांनी आर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आरोपी आणि पीडिती दोघेही सोबत सुनीलच्या नातेवाईकाकडे बरेच दिवस फिरत राहिले. याच दरम्याने त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातूनच ती गर्भवती राहिल्याने अमरावतीच्या एका रुग्णालयात तपासणी केली.
त्यानंतर आरोपीने पीडितेला त्याच्या काकूकडे नागपूर येथे मुक्कामी ठेवले. तिला सातवा महिना लागल्यानंतर आरोपी तिच्यासह मूळ गावी आला. घरी आल्यानंतर तिला मारहाण करीत असल्याने अखेर तिने वडिलांचे घर गाठले. आरोपी पीडितेला जीवे मारण्याची धमकी देत होता, असे वडिलांना सांगितल्यावर याप्रकरणी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिला रुग्णालयात पाठविल्यानंतर काही दिवसांनी तिने मुलाला जन्म दिला.
याप्रकरणी सुनील सोमकुवर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन पोलीस उपनिरीक्षक कविता अशोक फुले यांनी तपास पूर्ण करुन दोषारोपपत्र दाखल केले. न्यायाधीश व्ही.टी.सूर्यवंशी यांनी दोन्ही बाजुचा युक्तिवाद ऐकून आरोपीस दहा वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच पीडितेला मनोधैर्य योजनेतून नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. सरकारतर्फे विशेष सरकारी अभियोक्ता विनय घुडे यांनी युक्तिवाद केला. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून अजय खांडरे यांनी सहकार्य केले.