लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/देवळी : जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर नवीन कोविड बाधित वेळी ट्रेस करता यावा तसेच कोरोनाच्या प्रसाराला ब्रेक लागावा म्हणून जिल्ह्यात विविध ठिकाणी विशेष शिबिर घेऊन कोविड चाचणी केली जात आहे. याच शिबिरांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नियमांचे पालन केले जाते काय याचा लोकमतच्या प्रतिनिधीने देवळी आणि वर्धा येथील शिबिरात जाऊन रिॲलिटी चेक केला असता फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करूनच विशेष शिबिरांमध्ये कोविड टेस्ट केली जात असल्याचे चित्र बघावयास मिळाले.देवळी येथील आठवडी बाजार परिसरात शुक्रवारी विशेष शिबिर घेऊन व्यावसायिकांची कोविड चाचणी करण्यात आली. या ठिकाणी तब्बल ५३३ व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत कोविड चाचणी केली. यापैकी ४३ व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना अलगीकरणात ठेवण्यात आले आहे, तर वर्धा नगरपालिकेच्या वतीने वर्धा शहरातील रामनगर भागातील चित्तरंजन शाळेत शनिवारी सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत कोविड चाचणी शिबिर घेण्यात आले. या ठिकाणी ७१ व्यक्तींनी कोविड चाचणी करून घेतली. त्यापैकी तीन व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. या ठिकाणीही पालिका कर्मचाऱ्यांकडून कोविड चाचणी करण्यासाठी आलेल्या प्रत्येकाकडून नियमाचे पालन करून घेण्यात आले.
कोरोनायनात त्रिसूत्रीचे पालन महत्त्वाचेचसध्याच्या कोरोना संकटात स्वत:सह स्वत:च्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने वारंवार हात धुणे, घराबाहेर पडल्यावर मास्कचा वापर करणे तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन या त्रिसूत्रीचे पालन करणे महत्त्वाचेच आहे. तसे आवाहनही अधिकाऱ्यांकडून केले जात आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने लक्ष राहून स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे.
प्रतिक्रीया
शुक्रवारी न.प. कार्यालय देवळी तसेच नाट्यगृहाच्या परिसरात कोविड चाचणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ५३३ व्यावसायिकांसह नागरिकांनी कोविड चाचणी करून घेतली. त्यापैकी ४३ व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सर्व कोविड बाधितांना चांगली आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न आरोग्य विभाग करीत आहे.- डॉ. प्रवीण धमाणे, तालुका आरोग्य अधिकारी, देवळी.
आठवडी बाजारात दुकाने थाटणाऱ्यांना न. प. देवळी व आरोग्य विभागाने काेविड चाचणी बंधनकारक केल्याने विशेष कोविड चाचणी शिबिरात जाऊन कोरोना टेस्ट केली. तपासणीत कोविड पॉझिटिव्ह आल्याने दुकान बंद करून राहते घरी गृहअलगीकरणात ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे दहा दिवसांपूर्वी मी कोविड चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली होती.- ईश्वर दुर्गे, व्यावसायिक, देवळी.