१३ गावांचा करता येईल समावेश : शेतकरी कामगार संघर्ष परिषदेचे पोलीस अधीक्षकांना साकडेवर्धा : वायफड हे गाव जिल्हा परिषद सर्कल आहे. वायफड येथून पुलगाव पोलीस ठाणे १८ ते २० किमी अंतरावर आहे. वर्धा पोलीस ठाणेही १८ ते २० किमी अंतरावर आहे. यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. वायफडशी परिसरातील १३ गावांचा संपर्क येत असल्याने येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करावी, अशी मागणी शेतकरी कामगार संघर्ष परिषदेने केली. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनही देण्यात आले.वायफड येथे पोलीस ठाण्याची निर्मिती झाल्यास परिसरातील १३ गावांचा समावेश करता येतो. यासत आमला, धामणगाव, वाठोडा, दहेगाव (मि.), अंबोडा, दहेगाव (स्टेशन), दहेगाव (गावंडे), केळापूर, कुरझडी (फोर्ट), लोनसावळी, शेकापूर, डोरली आदी गावांचा समावेश आहे. ही गावे वायफड पोलीस ठाण्याशी जोडल्यास तेथील नागरिकांना सोईस्कर होणार आहे. एवढ्या गावांसाठी नियमानुसार पोलीस ठाणे देता येत नसेल तर किमान पोलीस चौकी देण्यात यावी. चौकीमध्ये दोन बिट जमादार, दोन शिपाई, दोन महिला शिपाई असे सहा कर्मचाऱ्यांची चौकी द्यावी. यासाठी शासनाने स्वतंत्र इमारत बांधावी. वायफड ग्रा.पं. कडे चार ले-आऊटमध्ये चार ओपन स्पेस आहे. या जागेवर वडाळकर ले-आऊट वॉर्ड क्र. ४ मध्ये पोलीस चौकी वा ठाण्याचे बांधकाम होऊ शकते. वायफड ते कुरझडी या मार्गावर महिन्याकाठी एक ते दोन अपघात होतात. शिवाय दारूविक्री व अन्य अवैध व्यवसायही वाढलेले आहेत. त्यावर नियंत्रणाकरिताही पोलीस ठाणे वा चौकी निर्माण होणे गरजेचे आहे. सर्कलमध्ये मोठे गाव वायफड असल्याने पोलीस प्रशासन जनतेला सुरक्षेची हमी देऊ शकते. ही बाब लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देत पोलीस ठाणे वा चौकीची निर्मिती करवी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शेतकरी कामगार संघर्ष परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर निघोट, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर परबत, प्रेमदास शेंदरे, शोभा वानखेडे आणि पदाधिकारी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)अवैध व्यवसायांवर आळा घालणे होईल शक्यवायफड पारधी बेडा दारूविक्रीसाठी कुप्रसिद्ध होता. शिवाय चोऱ्या व अवैध व्यवसायांचे प्रमाणही परिसरातील गावांमध्ये वाढल्याचे दिसून येते. या अवैध व्यवसायांवर आळा घालताना पुलगाव आणि वर्धा पोलीस ठाणे तसेच पोलीस यंत्रणेची दमछाक होते. वायफड येथे पोलीस ठाणे वा चौकीची निर्मिती झाल्यास अवैध व्यवसायांवर आळा घालणे शक्य होणार आहे. यामुळे ही मागणी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
वायफड येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करा
By admin | Published: August 22, 2016 12:34 AM