लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्रामध्ये इमारत व इतर बांधकाम कामगारांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये नोंदणीकृत कामगारही बरेच असून, त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याकरिता पेन्शनसह स्वतंत्र आरोग्य व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केंद्रीय श्रममंत्री रामेश्वर तेली यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे. वर्धा जिल्ह्यामध्येही इमारत व इतर बांधकाम कामगार असून, त्यांच्याकरिता महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून विविध योजना राबविल्या जातात. परंतु कामगारांना कायमस्वरूपी आधार मिळत नसल्याबाबत स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष उमेश अग्निहोत्री यांनी खासदार रामदास तडस यांची भेट घेऊन अवगत करून दिले. कामगारांच्या हिताकरिता शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणीही केली होती. याची दखल घेत खासदार तडस यांनी ना. तेली यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील बांधकाम कामगाराच्या व्यथा मांडल्या. महाराष्ट्रात बांधकाम कामगारांकरिता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ अस्तिवात असून, त्याच मंडळाच्या माध्यमातून नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरिता वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा ५ हजार रु. पेन्शन सुरू करावी. तसेच प्रत्येक जिल्ह्यात नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरिता स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्यासंदर्भात कल्याणकारी मंडळाला निर्देशित करावे, अशी मागणीही केली.