आरोपीला अटक : दारूच्या नशेत पोलीस ठाण्यात धुडघूस लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : गावातील एका महिलेने दिलेल्या तक्रारीचा वचपा काढण्याकरिता शिवसेना तालुका संघटक सुनील पारसे रा. वडगाव (खुर्द) याने दारूच्या नशेत आपले चारचाकी वाहन थेट पोलीस ठाण्याच्या पोर्चमध्ये घुसवून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. शिवाय यावेळी पोलिसांना शिवीगाळही केली. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी पारसे याला ताब्यात घेत त्याच्याविरूद्ध भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे.शिवसेना तालुका संघटक असलेले सुनील पारसे यांचा गावातील महिलेशी वाद झाला. याची तक्रार वैशाली खोबे नामक महिलेने पोलिसात दाखल केली. याबबात सेलू पोलिसांनी गुन्हा नोंद केल्याची माहिती आहे. यामुळे चवताळलेल्या पारसेने पोलिसांना जाब विचारण्यासाठी तीन महिलांना गाडीत घेवून बुधवारी रात्री पोलीस ठाणे गाठले. यावेळी त्यांनी एमएच २९ आर ५४७२ ही कार थेट पोलीस ठाण्याच्या पोर्चमध्ये ठाणेदाराच्या कॅबीन समोर चढविली. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक शुभांगी तकीत, शिपाई कपील मेश्राम तिथे हजर होते. दारूच्या नशेत असलेल्या सुनील पारसे यांनी गाडीतून उतरताच पोलिसांना शिवीगाळ करणे सुरू केले. हा प्रकार पाहून सर्वच अवाक झाले. दारूच्या नशेत हयगयीने वाहन चालवून शासकीय मालमत्तेचे नुकसान करीत पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या शिवसेना संघटकास पोलिसांनी प्रथम चोप देत ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शुभांगी ताकीत यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम २७९ (हयगयीने वाहन चालविणे), १८५ (मोटर वाहन कायदा), १८६ (शासकीय कामात अडथळा आणणे) व २९४ (अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे) आदि कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सेलू पोलीस करीत आहेत. मी घटनेच्यावेळी पोलीस ठाण्यात हजर होते. सुनील पारीसेने त्याच्या ताब्यातील वाहन सरळ पोलीस ठाण्याच्या पोर्चमध्ये घुसविले. पारसे दारू पिऊन होता. तसेच तो अर्वाच्च शिवीगाळ करीत होता. या प्रकरणी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याला अटक करण्यात आली. - शुभांगी ताकीत, पोलीस उपनिरीक्षक, सेलू.
शिवसेना तालुका संघटकावर गुन्हा
By admin | Published: May 26, 2017 12:51 AM