लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीनही जिल्ह्यांत दारूबंदी असली तरी चोरट्या मार्गाने परप्रांतातून दारूची मोठ्या प्रमाणावर आयात केली जात आहे. यामुळे या जिल्ह्यांत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अवैध दारूविक्री यामागे मुख्य कारण असल्याचे सामाजिक संस्थांच्या पाहणीतून दिसून आले आहे.राज्य सरकारने वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत दारूबंदी केली आहे; पण मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यातून मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने दारू पाठविण्यात येत आहे. नागपूर मार्गे जाम, समुद्रपूर, चंद्रपूर असा दारू वाहतुकीचा कॉरीडोअरच तयार करण्यात आला आहे. दररोज शेकडो वाहनांतून ना-ना युक्त्या वापरून दारूची वाहतूक केली जात आहे. समुद्रपूर पोलिसांनी सहा महिन्यांत पकडलेल्या दारूच्या आकडेवारीवरून चोरट्या मार्गाने होत असलेल्या दारू वाहतुकीचे वास्तव समोर आले आहे. वर्धा शहरात व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात देशी, विदेशी व मोहा फुलाची दारू सहजपणे उपलब्ध होत आहे. या अवैध दारूविक्रीमुळे शहरांसह ग्रामीण भागातही गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड प्रमाणावर वाढले आहे. तरूण वर्ग व्यसनाच्या अधीन झाल्याचे दिसून येत आहे. राज्य शासनाने दारूबंदी केली असली तरी याची अंमलबजावणी करण्यासाठी कोणतीही विशेष यंत्रणा उभारल्याचे दिसून येत नाही. शिवाय दारूबंदी उत्पादन शुल्क विभागात तीनही जिल्ह्यांत जवळपास दीडशेच्या वर अधिक पदे रिक्त आहेत. ती कधीही भरलीच जात नाहीत. वर्धा दारूबंदी उत्पादन शुल्क विभागात कारवाईसाठीही चंद्रपूर कार्यालयातून पोलीस निरीक्षक व कर्मचारी येतात, ही स्थिती आहे. यामुळे या विभागाकडून अवैध दारूविक्री विरूद्ध मोहीमच बंद करण्यात आल्या आहेत.घोषणा हवेतचराज्य शासनाने वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीन जिल्ह्यांत दारूबंदी केली आहे. वर्धा व गडचिरोलीचा दारूबंदीचा निर्णय फारसा यशस्वी झाला नसतानाही १ एप्रिल २०१५ रोजी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. ही दारूबंदी करताना राज्य सरकारने या तीनही जिल्ह्यांत व्यसनमुक्तीचा कार्यक्रम धडकपणे राबविण्यासाठी निधी देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. शिवाय दारूबंदी जिल्ह्याच्या सिमेपासून २५ किलोमीटर अंतरातील सर्व दारूची परवानाप्राप्त दुकाने बंद करण्यात येईल. दारूच्या केसेसमध्ये तपासणी अहवाल तत्काळ यावा, यासाठी फिरती प्रयोगशाळा उघडण्यात येईल, असे जाहीर केले होते; पण यातील एकही घोषणा अद्याप मूर्त रूपात साकारली नाही. यामुळे दारूबंदीबाबतच्या सर्व घोषणा हवेतच विरत असल्याचे प्रकर्षाने जाणवते.
दारूविक्रीमुळे गुन्हेगारीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:01 AM
वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीनही जिल्ह्यांत दारूबंदी असली तरी चोरट्या मार्गाने परप्रांतातून दारूची मोठ्या प्रमाणावर आयात केली जात आहे. यामुळे या जिल्ह्यांत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
ठळक मुद्देशासनाचे अंमलबजावणीकडे दुर्लक्ष : पोलीस व उत्पादन शुल्क यंत्रणा सुस्त