लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरात नागरिकांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी एकूण तीन प्रकरणे पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल करण्यात आली आहेत. यातील दोन प्रकरणांचा तपास सुरू असून एक प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. लवकरच व्हॉइट कॉलर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणार असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. २५ लाखांवर जर फसवणूक झाली असेल तर ते प्रकरण गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येते. आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून समांतर तपास करण्यात येतो. आर्थिक गुन्हे शाखेकडे तीन प्रकरणे दाखल झाली होती. एका प्रकरणात तर सुमारे १७ हजारांवर नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. हे प्रकरण शहरासह संपूर्ण महाराष्ट्रभर चांगलेच गाजले. फसवणूक झालेल्या सर्व नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळवून देत त्यांना न्याय देण्यासाठी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे, साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव, साहाय्यक पोलीस निरीक्षक तिरुपती राणे, कर्मचारी संतोष जयस्वाल, शैलेश भालशंकर, कुणाल डांगे, आशिष महेशगौरी हे आपले कर्तव्य बजावत आहेत. आर्थिक फसवणूक झालेल्या प्रकरणाचा तपास अतिशय विस्तृत आणि क्लिष्ट असल्याने पोलिसांनाही प्रकरणाचा छडा लावताना मोठ्या अडचणी येतात. मात्र, तीन प्रकरणांपैकी एक प्रकरण न्यायप्रविष्ट असून इतर दोन प्रकरणांचाही तपास युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच व्हाइट काॅलर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणार असल्याचे पोलिसांकडून, आर्थिक गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले.
मैत्रेय, सुवर्ण सिद्धी संस्थेत कोटीचा अपहार
एमपीआयडी कायद्यांतर्गत नागरिकांची फसवणूक झालेले प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल केले जाते. मैत्रेय या संस्थेत नागरिकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, मैत्रेय संस्थेच्या मालकाने नागरिकांच्या पैशावर डल्ला मारून एकट्या वर्धा जिल्ह्यातील सुमारे १७ हजारांवर नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. सुमारे दोन ते तीन कपाटे भरून नागरिकांच्या तक्रारी असून आर्थिक गुन्हे शाखेत काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून पुढील तपास सुरू आहे.
‘मैत्रेय’चा घोटाळा गाजला
मैत्रेय या संस्थेने शहरासह जिल्ह्यातील सुमारे १७ हजारांवर नागरिकांकडून पैसे घेऊन त्यांची कोट्यवधींची फसवणूक केली. मैत्रेयच्या मालकाला अटक झाल्यानंतर खातेदारांमध्ये कमालीचा रोष निर्माण झाला होता. रामनगर परिसरात असलेल्या मैत्रेयच्या कार्यालयातही नागरिकांनी दगडफेक केली होती. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे साेपविण्यात आला. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून मैत्रेयचा हा घोटाळा जिल्ह्यात चांगलाच गाजला होता.
चार प्रकरणांचा तपास यु्द्धपातळीवर
२५ लाखांच्या वरील रकमेचा अपहार झाला असेल तर ते प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येते. बँकेची फसवणूक, पंचायत समितीतील फसवणूक अशा प्रकरणांमध्ये शासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्याच्या चार प्रकरणांचा तपास सुरू आहे. असे प्रकरण अतिशय क्लिष्ट असल्याने तसेच संपूर्ण ऑडिट करून योग्य निष्कर्ष काढल्यानंतरच गुन्हेगारास अटक केली जाते. मात्र, हे सर्व करताना पोलिसांना मोठ्या अडचणी येतात. तरीही आर्थिक गुन्हे शाखेकडून अशा चार प्रकरणांचा तपास युद्धपातळीवर सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.