आर्वी (वर्धा)/ गोंदिया/ भंडारा : अतिवृष्टीमुळे स्वप्नांवर पाणी फेरल्याने हताश झालेल्या तीन शेतकऱ्यांनी आपले जीनव संपवले. आर्वी तालुक्याती उमरी (सुकळी) येथील शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून शेतातच विष प्राशन केले. त्यांना तातडीने सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
लोकराज मारोतराव कालोकार (४५, रा. उमरी (सुकळी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे सहा एकर शेती असून यावर्षी अतिवृष्टीने सर्व पीक खरडून गेल्याने त्यांची शेती पडीक राहिली. तीन वर्षांपासून त्यांच्याकडे मोरांगणा शाखेच्या बँक ऑफ इंडिया शाखेचे दीड लाख रुपयांचे कर्ज होते. आता बँकेचे कर्ज वसुलीकरिता तगादा लावला होता तसेच यावर्षी शेती पडीक राहिल्याने उत्पन्नाची काहीच अपेक्षा नसल्याने ते आर्थिक विवंचनेत सापडले होते. त्यामुळे लोकराज हे सतत चिंतेत असायचे. यातूनच त्यांनी २८ ऑक्टोबरला पुतण्याच्या शेतात जावून विष प्राशन केले.
ही बाब पुतण्या व कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले. येथे उपचार सुरु असताना ३० ऑक्टोबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने या परिवारावर मोठे संकट ओढावले आहे.
गोंदिया जिल्ह्यात विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या
आमगाव तालुक्यातील ग्राम जवरी येथील शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता दरम्यान घडली. मदन बकाराम गायधने (४८) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मदन गायधने यांनी अनेकांकडून उसने पैसे घेतले होते. त्यात यंदा पावसाने धुमाकूळ घातला. आता माव्याने कहर केल्याने ते चिंताग्रस्त होते. यातच त्यांनी सतत होत असलेली नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन केले. विष प्राशन केल्यानंतर ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच घरच्यांनी त्यांना आमगावच्या ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
भंडाऱ्यात शेतकऱ्याने पीक नुकसानीला कंटाळून संपवले जीवन
खरिपात लागवडीखालील धान पीक पुराच्या पाण्याने नष्ट झाल्याने चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना लाखांदूर तालुक्यातील चिचोली येथील नर्सरी परिसरात सोमवारी सकाळी ५ च्या सुमारास उघडकीस आली. सीताराम महादेव शेंडे (६५, रा. भागडी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
सीताराम शेंडे यांचे भागडी ते मांढळ मार्गावरील नाल्यानजीक जवळपास दीड एकर शेतजमीन आहे. खरीप हंगामात धान पिकाची लागवड केली होती. मात्र, मुसळधार पावसासह तब्बल तीनदा चुलबंद नदीसह नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली होती. शेती नाल्याच्या बाजूला असल्याने पुराचे पाणी शेतात शिरल्याने पीक नष्ट झाले. लागवडीखालील पिकांवर हजारो रुपये खर्च करून देखील पुराच्या पाण्याने पीक नष्ट झाल्याने शेंडे हे विवंचनेत होते. घटनेच्या दिवशी घरात कुणालाही न सांगता ते निघून गेले. चिचोली येथील नर्सरीतील एका झाडाला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, तपास ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.