देर्डा येथे धाम आणि बोर नदीचा संगम : विहिरींतील पाण्याच्या पातळीतही घट लोकमत न्यूज नेटवर्क सेवाग्राम : चानकी व कोपरा या दोन गावांमधून वाहणाऱ्या बोर नदीचे पात्र कोरडे पडले आहे. या नदीच्या आधरावर असलेल्या शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी आता मात्र संकटात सापडली आहेत. या पिकांना वाचविण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. अडेगाव येथून आलेली बोर नदी अनेक गावांना वळसा घालून सुजलाम सुफलाम करीत पुढे देर्डा -सावंगी या दोन गावात पोहोचली. येथे बोर व धाम नदीचा संगम झाला. या संगमामुळे नदीकाठच्या गावाना ओलिताची सोय झाली. सिंचनाच्या सुविधेमुळे शेतकरी सुखावला. आर्थिक उत्पन्नात भर पडायला लागली. ऐवढेच नाही तर मुख्य मार्गावरील कास्तकार फळ, भाजीपाला, ऊस आदी पिकांकडे वळल्याचे दिसून आले. येथील बरेच शेतकरी उन्हाळी भुईमुुंगाकडे वळले; मात्र पाणी नसल्याने पीक धोक्यात आली. एप्रिल महिन्यातच कोपरा व चानकी या गावाजवळ नदीच्या जलपातळीत वेगाने घट झाली आहे. दोन्ही गावच्या पाणीपुरवठा विहिरी नदीच्या काठावर आहे. कोपरा येथील विहिरीला पाणी मुबलक असते. पण नदी पात्र कोरडे पडायला लागताच विहिरीची पाणी पातळी खालावली. दोन ठिकाणी बंधारे बनविण्यात आल्याने पाणी अडले. याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. पण उपस्याचे प्रमाणच मोठे असल्याने तेथील पाणीही आटले. यामुळे आता पाण्याअभावी पिके धोक्यात आली आहेत. चानकी गावाच्या पाणी पुरवठा विहीर नदी काठावर होती. पाणी लागले नसल्याने झऱ्यामोह या ठिकाणावरील विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो. बंधाऱ्याची दुरूस्ती नदीचे खोलीकरण व रूंदीकरणासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेला आहे. दोन महिने पाणी समस्येचा सामना शेतकरी व गोपालकांना करावा लागणार. - पंढरीनाथ राऊत, सरपंच, चानकी ग्रामपंचायत
बोर नदीपात्र कोरडे पडल्याने पिके संकटात
By admin | Published: May 19, 2017 2:16 AM