लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : परवान्यांचे नूतनीकरण न करता दिवसाढवळ्या आणि चंदेरी प्रकाशात गौणखनिजाची चोरी करणाऱ्या सावंगी मेघे परिसरातील चार खाणपट्टे, क्रशरला खनिकर्म विभागाने बंदचा आदेश दिला. सहा महिन्यांपासून अवैधरीत्या खनन करण्यात आल्याने शासनाला मात्र कोटी रुपयांच्या महसुलाला मुकावे लागले.जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून वाळूमाफियांसह खाण-क्रशरमालकांनी प्रचंड धुडगूस घातला आहे. सावंगी मेघे परिसरात परवान्याचे नूतनीकरण न करता मागील सहा महिन्यांपासून गौण खनिजाचे वारेमाप उत्खनन सुरू होते. यात पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असून या खाणी वन्यप्राणी, मानवाच्या मुळावर उठल्या आहेत. याविषयी परिसराचे जागरूक तलाठी देवेंद्र राऊत यांना माहिती मिळताच त्यांनी परिसराची पाहणी केल्यानंतर गौणखनिज चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी खनिकर्म अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला. दरम्यान, या चार खाणी, क्रशर खनिकर्म अधिकाºयांच्या आदेशावरून बंद करण्यात आल्या. भीमसेन लालवाणी, चंद्रकांत दौड यांचे खाणपट्टे तर चोहितमल लालवाणी, सतीश जेठवा यांच्या क्रशरवर ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान क्रशर मशिनी गायब करण्यात आल्या होत्या. सावंगी परिसरातून कोटी रुपयांच्या गौण खनिजाचे उत्खनन करण्यात आल्याची बाब पाहणीदरम्यान उजेडात आल्याचे खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. उत्खनन झालेल्या भागाचे मूल्यांकन करण्यात येणार असून त्यानंतर उत्खननकर्त्यांकडून रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. गौणखनिज चोरी केल्यानंतर वरील खाण-क्रशरमालकांनी खनिकर्म विभागाकडे परवाना नूतनीकरणाकरिता अर्ज सादर केले आहेत. विशेष म्हणजे, खाणमालकांनी अकृषक करही बुडविला. खाण-क्रशरमालकांना तहसीलदारांमार्फत नोटीस बजावण्यात आली आहे.येळाकेळीतून खनन सुरूचयेळाकेळी येथील खाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये बंद करण्यात आल्या आहेत. असे असताना रात्री-अपरात्री खाणपट्ट्यांतून गौण खनिजाचे खनन, शिवाय वाहतूकदेखील करण्यात येत आहे. खाणी बंद झाल्यानंतरही गौणखनिज माफियांचा हा गोरखधंदा सुरूच असून शासनाच्या महसुलाला चुना लागत आहे, तर माफिया दिवसेंदिवस गब्बर होत आहेत. या परिसरातील अवैध खननाने जिल्हा प्रशासनाने आव्हान उभे केले आहे.जिल्हा प्रशासन अनभिज्ञ कसे?गौणखनिज चोरीचा हा गोरखधंदा उशिराने का होईना उजेडात आला. पण, कित्येक महिन्यांपासून हा गौणखनिज चोरीचा हा प्रकार सुरू असताना यापासून जिल्हा प्रशासन अनभिज्ञ कसे, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. प्रशासनातीलच ‘काही‘ अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा चोरटा प्रकार सुरू आहे. जिल्हाधिकाºयांनी याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.तलाठ्याच्या अहवालाच्या आधारावर सावंगी परिसरातील खाणपट्ट्यांची पाहणी करण्यात आली. आवश्यक परवाना नसताना उत्खनन करण्यात आल्याचे आढळून आले आहे. या खाण क्रशरमालकांना काम बंदचे आदेश देण्यात आले आहेत. उत्खनन झालेल्या जागेच्या मूल्यमापनानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.-डॉ. इम्रान शेख, जिल्हा खनिकर्म अधिकारी, वर्धापरवाना आणि लीज संपल्यानंतरदेखील नूतनीकरण न करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्या आधारे क्रशर व खाणपट्ट्यांचा आढावा घेतला. यामध्ये प्रचंड गैरप्रकार आढळून आला. यासंदर्भात जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला आहे.देवेंद्र राऊत, तलाठी, सावंगी
गौणखनिज चोरीची कोटींची उड्डाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:07 AM
परवान्यांचे नूतनीकरण न करता दिवसाढवळ्या आणि चंदेरी प्रकाशात गौणखनिजाची चोरी करणाऱ्या सावंगी मेघे परिसरातील चार खाणपट्टे, क्रशरला खनिकर्म विभागाने बंदचा आदेश दिला. सहा महिन्यांपासून अवैधरीत्या खनन करण्यात आल्याने शासनाला मात्र कोटी रुपयांच्या महसुलाला मुकावे लागले.
ठळक मुद्देचार क्रशर, खाणींना खनिकर्मकडून बंदचा आदेश