२१३ जागांकरिता ४४४ अर्ज वर्धा : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या वसतीगृहाचा लाभ अत्यल्प मुलांना मिळत आहे. या लाभापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता शासनाच्यातीने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ जाहीर करीत आधार देण्याचा प्रयत्न केला. या योजनेचे हे पहिले वर्ष असून यात जिल्ह्यातील २१३ लाभार्थ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. असे असताना वर्धेत मात्र या योजनेच्या लाभाकरिता चांगलीच गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे. या योजनेकरिता आतापर्यंत तब्बल ४४४ अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यात सध्या व्यवसायिक आणि बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमाची गर्दी वाढत आहे. या अभ्याक्रमाकरिता दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. यात अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना निवासी व्यवस्था करणे अवघड जाते. शिवाय उपलब्ध असलेल्या वसतिगृहातही त्यांना जागा मिळणे कठीण जाते. यामुळे त्यांना बाहेरच निवास आणि भोजनाची सोय पुरविण्याकरिता ही योजना अंमलात आणली आहे. विद्यार्थ्यांच्या आधार कार्डाशी लिंक असलेल्या या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यातून मिळणार आहे. यातही योजनेचा लाभ घेण्याकरिता अनेक अटी टाकण्यात आल्या आहेत. उपलब्ध जागांपेक्षा अधिक अर्जस्वाधार योजना : शिक्षण पूर्ण होईपर्यंत लाभवर्धा : या योजनेचा लाभ घेण्याकरिता अकराव्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या ८५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या ८५ जागांकरिता वर्धेत तब्बल ९९ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. बारावीनंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता प्रत्येकी ६४ अशा १२८ जागा ठेवण्यात आल्या आहेत. या जागांकरिता २३६ अर्ज प्राप्त झाले आहेत. या व्यतिरिक्त बारावीनंतरच्या शिक्षणाकरिता तब्बल १०९ अर्ज आॅनलाईन प्राप्त झाल्याची माहिती आहे. यातील किती जणांना या योजनेचा लाभ मिळतो, हे निवड यादीनंतरच कळणार आहे. स्वाधार योजनेचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध असणे अनिवार्य आहे. शिवाय तो ज्या शहरात शिक्षण घेत आहे, त्या शहराचा नसावा, तसेच त्याचे वार्षिक उत्पन्न २.५० ला रुपयांच्या वर नसावे, या सोबतच त्याला अर्ज करण्यापूर्वी दिलेल्या परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळणे अनिवार्य आहे. यासह अन्य अटींसह मिळणाऱ्या या योजनेचा लाभ विद्यार्थ्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत सुरू राहणार आहे.(शहर प्रतिनिधी)एका विद्यार्थ्याला ४३ हजार रुपये या योजनेचा लाभ घेणाऱ्या एका विद्यार्थ्याला ४३ हजार रुपये मिळणार आहे. यात भोजन भत्ता २५ हजार, निवास भत्ता १२ हजार व निर्वाह भत्ता सहा हजार रुपये देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दोन्ही पर्याय अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह आणि स्वाधार योजना हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. यात विद्यार्थ्याला कोणता पर्याय निवडायचा याचा निर्णय त्यालाच घ्यावा लागणार आहे. स्वाधार योजनेचा लाभ सर्वच लाभार्थ्यांना मिळावा याकरिता १४ एप्रिल पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. उद्दिष्टापेक्षा अधिक अर्ज येत असल्याने त्याचा लाभ अटी व नियम पाळून देण्यात येणार आहे. - बाबासाहेब देशमुख, सहा.आयुक्त, सामाजिक न्याय विभाग, वर्धा.
‘स्वाधार’करिता गर्दी
By admin | Published: April 12, 2017 12:19 AM