लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कुणाला शिक्षणासाठी तर कुणाला ग्रामपंचायतींच्या निवडणुकींसाठी जातवैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने साऱ्यांनीच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या जातवैधता प्रमाणपत्र कार्यालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या कार्यालयात एकच गर्दी उसळली असून कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या सूचनानंतरही विद्यार्थी व उमेदवार कोरोनाच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले आहे.शाळा महाविद्यालयाचे लागलेले निकाल आणि ग्रामपंचायतीचा निवडणुकींचे घमासान सुरु झाले आहे. अनेक दिवसांपासून शाळा व महाविद्यालये बंद होती. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होताच विद्यार्थ्यांनी जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धडपडत आहे. यातच आता जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकींचा बिगुल वाजल्याने इच्छूकांनी ‘कास्ट व्हॅलिडिटी’ मिळविण्याकरिता सामाजिक न्याय विभागात गर्दी केली आहे. या गर्दीचा अंदाज घेऊन संबंधित विभागाने एक ऐवजी आता तीन केंद्र सुरु केले आहे. वारंवार सूचना दिल्यानंतरही विद्यार्थी व उमेदवार येथे गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सहकार्याची गरज व्यक्त होत आहे.
८३ विद्यार्थ्यांचे अर्ज अकरावी उत्तीर्ण होऊन बारावी विज्ञान शाखेत प्रवेश करणारे विद्यार्थी शिक्षणाकरिता जातवैधता प्रमाणपत्राकरिता अर्ज करीत आहे. सोमवारी एकूण ८३ अर्ज या कार्यालयाला प्राप्त झाले होते. या कार्यालयातून सप्टेंबर महिन्यापर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. सध्या विद्यार्थी कमी आहे.
१२२ उमेदवाराचे अर्ज आठही तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीच्या निवडणुका असून सर्वाधिक ग्रामपंचायती समुद्रपूर तालुक्यातील आहे. सर्व ग्रामपंचायतीचे उमेदवार वर्धातील कार्यालयात येत असल्याने सोमवारी तब्बल १२२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. आता दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत.
प्रशासनातर्फे दक्षतासामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात मुख्यव्दारावरच नोंदणी केली जाते. या ठिकाणी गर्दी होत असल्याने बाहेरच केंद्र सुरु केले आहे. येथे आवश्यक ती व्यवस्था केली नसल्याने विद्यार्थी व उमेदवार गर्दी करीत आहे. वारंवार सूचना दिल्यानंतरही सहकार्य मिळत नसल्याचे चित्र आहे.दररोज येतात शंभरावर अर्जबारावीत प्रवेशित विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने विद्यार्थ्यांचे दररोज जवळपास ५० अर्ज येतात पण, आता निवडणूक असल्याने अर्जाची संख्या शंभरावर गेलेली आहे. त्यामुळे कार्यालयात गर्दी वाढली आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी इच्छूक उमेदवार आणि विद्यार्थ्यांचीही एकाच वेळी गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी एक ऐवजी आता तीन केंद्र सुरु केले असून तेथे सहा कर्मचारी कार्यरत आहे. उमेदवार व विद्यार्थ्यांना वारंवार सूचना दिल्या जात आहे. त्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे. - शरद चव्हाण, उपायुक्त, सामाजिक न्याय विभाग, वर्धा.