तीन शेतकरी बाधित : आठ एकर कपाशी व तूर पिकाचे नुकसान आकोली : खरांगणा येथील शिवकुमार भुतडा यांचे पाणवाडी गावात शेत आहे. त्यांनी ऊसात तणनाशकाची फवारणी केली. यात बाजूच्या तीन शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी व तूर पिकाचे नुकसान झाले. एका शेतकऱ्याची कपाशी जळाली तर दोन शेतातील कपाशी, तूर व बांधावरील निंबाच्या झाडाची पाने पिवळी पडलीत. मौजा पाणवाडी येथे भुतडा नामक शेतकऱ्याच्या शेतालगत रणधीर भुतडा, भरत भुतडा व श्रीधर मुडे यांची शेती आहे. रणधीर यांनी दोन एकरात कपाशी तर अर्ध्या एकरात तूर पीक लावले. तणनाशकाची फवारणी केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत पिकांवर दुष्परिणाम होऊ लागला. प्रथम पिके पिवळी पडली व हळूहळू कपाशीचे झाड जळाले. याचा सर्वाधिक फटका रणधीर यांना बसला असून त्यांची ७५ टक्के कपाशी, तूर जळाली. भरत व मुडे यांच्या प्रत्येकी अडीच एकरातील कपाशी पिवळी पडली. सदर शेतकऱ्याने फवारणी केलेले तणनाशक उन्हाळ्यात गहू पेरण्यापूर्वी फवारता येते. सदर तणनाशक हवेतून इतर शेतातील पिकांवर प्रभाव करते. यामुळे पावसाळ्यात कृषी केंद्र मालक सदर तणनाशकाची विक्री करीत नाही. शिवकुमार कृषी व्यावसायिक असताना ते अनभिज्ञ कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कृषी विभागाने शेतकऱ्याला मार्गदर्शन करीत न्याय मिळवून देणे अपेक्षित असताना टाळाटाळ करीत आहे. घटनेला दहा दिवस लोटले असताना कृषी पर्यवेक्षकांनी पाहणी न करता शेतकऱ्यांना आर्वीला येण्याचा सल्ला दिला. कृषी अधीक्षकांनी न्याय देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)