पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले : गांधी पुतळ्याजवळ कलावंतांचे आंदोलन लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्याचे सांस्कृतिक सभागृह व्हावे या मागणीसाठी सामाजिक, सांस्कृतिक, संगीत, साहित्य आदी क्षेत्रातील कलावंतांनी गुरुवारी विकास भवनासमोर धरणे आंदोलन केले. कलात्मक पद्धतीने पार पडलेल्या धरणे आंदोलनात निदर्शने न करता नाट्यपदांचे सादरीकरण करण्यात आले. राज्य शासनाने गांधी जिल्ह्याच्या वैभवात भर टाकणारे प्रशस्त नाट्यगृह, सभाकक्ष, सुसज्ज आर्ट गॅलरी, ज्येष्ठांसाठी उद्यान, फुड कोर्ट, वाहनतळ आदींचा समावेश असणारे सांस्कृतिक संकूल निर्माण करावी, याबाबत रितसर घोषणा करावी व सभागृहासाठी आरक्षित जागेवर फलक लावावा, अशी मागणी जिल्हा सांस्कृतिक संकूल निर्माण समितीने केली होती. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल न घेतल्याने धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीला पालकमंत्री उपस्थित राहणार होते. यामुळे विकास भवनासमोर धरणे करण्यात आले होते. दुपारी १२ ते पालकमंत्री जाईस्तोवर धरणे देत ढोलकीच्या तालावर नाट्यपदांचे सादरीकरण करीत काव्यवाचन करण्यात आले. धरणे आंदोलनामध्ये संजय इंगळे तिगावकर, हरिष इथापे, नुतन माळवी, डॉ. राजेंद्र मुंढे, जीवन चोरे यांच्यासह कलावंत उपस्थित होते. निवेदन न स्वीकारताच परतले पालकमंत्रीपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आज शहरात अनेक कार्यक्रम होते. वेळ नसल्याने त्यांनी धरणे आंदोलनस्थळी येत निवेदन स्वीकारण्यास आधीच नकार दिला होता. पाच लोकांचे शिष्टमंडळ विकास भवनात पाठवा, तेथेच चर्चा करून निवेदन स्वीकारले जाईल, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते; पण कलावंत पालकमंत्र्यांन्यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारावे, या भूमिकेवर अटळ राहिले. यामुळे नियोजन समितीची बैठक आटोपताच मुनगंटीवार निवेदन न स्वीकारता दुसऱ्या कार्यक्रमासाठी रवाना झाले. यामुळे कलावंतांमध्ये नाराजी पसरली. हे आंदोलन असेच सुरू ठेवणार असून प्रत्येक बुधवारी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सांस्कृतिक सभागृहासाठी धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 2:20 AM