शस्त्र जप्त : आरोपी पोलिसांच्या स्वाधीन वर्धा : मुख्य मार्गावरील बडे चौक परिसरात चाकूच्या धाकावर दहशत माजवित व्यावसायिकांकडून जबरी वसुली करणाऱ्या दोन गुंडांना परिसरातील नागरिकांनी एकत्र येत चांगलाच चोप दिला. यात या आरोपीकडे असलेला चाकू हिसकावण्याच्या प्रयत्नात असलेला येथील एक युवक गंभीर जखमी झाला. नागरिकांनी प्रकाराची माहिती पोलिसांना देत या दोघांनाही पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना बुधवारी रात्री घडली. गुंडांशी झालेल्या झटापटीत अभिजित कमल कुलधरीया रा. हवालदारपुरा हा जखमी झाला. त्याच्यावर सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. प्रकाश उर्फ विक्की झामरे व अभिजित हिवंज दोन्ही रा. गोंड प्लॉट या दोघांना पडून नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तक्रारीवरून पोलिसांनी या दोघांविरूद्ध भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्की झामरे व त्याचा सहकारी अभिजित हिवंज हे दोघे बडे चौक परिसरातील व्यावसायिकांकडून शस्त्राच्या धाकावर पैसे उकळत होते. याचा त्रास या परिससरातील नागरिकांना अनेक दिवसांपासून होता. शिवाय विक्की झामरे याने याच परिसरात दहशत निर्माण करण्याकरिता एक पानटपरीही जाळण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलिसात केली होती. या प्रकरणात त्याने अटक पूर्व जामीन घेतला होता. असे असताना परिसरात त्याचा उपद्रव सुरूच होता. याची तक्रार पोलिसात करण्यात आली होती. तक्रार पोलिसात केल्यामुळे चवताळलेल्या विक्की झामरे याने या भागातील नागरिकांना अधिक त्रास देणे सुरू केले. यामुळे नागरिकांनी त्याला धडा शिकवण्यिाचा निर्णय घेतला. या बाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना पुर्वीच देण्यात आली होती. बुधवारी रात्री विक्की व त्याचा सहकारी अभिजित परिसरात येताच परिसरातील युवकांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात त्याच्या हातातील चाकू हिसकताना अभिजित कुलधरीया नामक युवक गंभीर जखमी झाला. यावेळी नागरिकांनी विक्की व त्याच्या सहकाऱ्याला पकडून चांगलेच चोपले. प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. ठाणेदार राजेंद्र शिरतोडे यांनी या दोघांवर गुन्हा दाखल करीत अटक केली आहे असून पुढील पोलीस करीत आहेत.(प्रतिनिधी) एमपीडीएची मागणी या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या विक्की झामरेवर एमपीडीए अंतर्गत कार्यवाही करून त्याना तडीपार करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना केल्याचे न.प. उपाध्यक्ष कमल कुलधरीया यांनी सांगितले.
शस्त्र दाखवून वसुली करणाऱ्या दोघांना नागरिकांचा चोप
By admin | Published: July 15, 2016 2:23 AM