लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सर्वसामान्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती व्हावी, या उद्देशाने यवतामळ येथील २१ वर्षीय तरुणी प्रणाली बेबी विठ्ठल चिकटे ही चक्क सायकलवरुन अख्ख्या विदर्भात सायकलने जनजागृती करीत आहे. सध्या ती मार्गस्थ होत असताना वर्ध्याला मुक्कामी होती. त्यानंतर ती आता नागपूरकडे रवाना झाली आहे. सध्या प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. महाराष्ट्रात प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. झाडांची कत्तल थांबवावी, असा संदेश ती गावोगावी जावून देत आहे. पर्यावरण संवर्धन , वृक्ष लागवड माेहीम व स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती करताना विविध अनुभव आल्याचे प्रणाली चिकाटे हिने सांगितले.
प्रणाली चिकाटे हिने सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार सोशल वर्क पडोली. जि. चंद्रपूर येथून बीएसडब्लूचे शिक्षण पूर्ण केले. प्रदुषण आणि पर्यावरणाचा वाढता ऱ्हास पाहता तीने नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे ठरविले. घरातील मंडळींना याबाबत समजावून स्वत:पासूनच सुरुवात करावी लागेल तेव्हाच क्रांती येवू शकेल, हे समजावून सांगितले. घरच्यांनीही तिला समजून घेतले. प्रणाली ही मागील महिनाभरापूर्वी यवतमाळ येथून पर्यावरणाची जनजागृती करण्यासाठी सायकलने भ्रमंतीसाठी निघाली. तिने यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धा अशा तब्ब्ल २२ गावांत सायकलने जात वाढते प्रदुषण आणि वाढते तापमान, जल प्रदुषण, ध्वनी प्रदुषणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली.
आज युवा पिढीमध्ये उपभोगाची वृत्ती वाढली आहे. केवळ वृक्षलागवड करणे म्हणजे पर्यावरणाचे रक्षण करणे होत नाही. त्यासाठी स्वतहापासून सुरुवात करणे गरजेचे आहे. आज रसायनिक खते शेतीला पोखरुन टाकत आहे. सर्व हायब्रीडने पिकविलेल्या भाज्या खायला मिळत आहे. लोकांची वाढती उपभोगाची वृत्ती अधोगतीला नेत आहे. यामुळे मानवी जीवनाचीही मोठी हानी होत आहे. आज प्रदुषणाचा वणवा पेटला असून त्यावर मात करण्यासाठी मी स्वतपासून सुरुवात केली आहे. महागडी वाहने न घेता सायकलचा वापर करण्याची नितांत गरज असल्याचे प्रणाली चिकाटे हिने सांगितले.