सहा लाखांचे नुकसान : सुदैवाने जीवित हानी टळलीगिरड : नजीकच्या पिंपळगाव येथे गॅस सिलिंडर लिक झाल्याने लागलेल्या आगीत घर जळून खाक झाले. ही घटना शुक्रवारी ९ वाजताच्या सुमारास घडली. या आगीत घर जळाल्याने सहा लाखांचे नुकसान झाले. आगीने उग्ररूप धारण करताच घरच्या सदस्यांनी पळ काढला. बंडू लोनबळे यांचा अपंग मुलगा उमेश लोनबळे (२२) हा आगीच्या ज्वाळांमुळे जखमी झाला.प्राप्त माहितीनुसार, येथील रहिवाशी बंडू लोनबळे यांच्या स्वयंपाकघरातील सिलिंडर संपले होते. यामुळे मुलगा उमेश लोनबळे याने दुसरे सिलिंडर लावले. या सिलिंडरचे रेग्यूलेटर बरोबर लागले नसल्याने गॅस लिक झाली. परिणामी, क्षणार्धात आगीने उग्ररूप धारण केले. दरम्यान, बंडू लोनबळे यांची पत्नी उषा लोनबळे, वडील व सर्व सदस्य घराबाहेर पळाले. गावातील नागरिकांनी अपंग उमेशला आगीच्या ज्वाळांतून काढण्यात यश मिळविले; पण तो जखमी झाला. यामुळे त्याला उपचारार्थ गिरडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. गावातील नागरिकांनी आग नियंत्रणात आणली; पण सुदैवाने सिलिंडरचा स्फोट झाला नाही. यामुळे पुढील अनर्थ टळला.या आगीत घरात ठेवलेला कापूस, सोयाबीन, धान्य, कपडे, टीव्ही आदी जीवनोपयोगी साहित्याची राखरांगोळी झाल्याने बंडू लोनबळे यांचे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले.घटनेची माहिती मिळताच गिरड ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.वाय. थोटे पोलीस ताफ्यासह गावात दाखल झाले. भाजपाचे तालुका सरचिटणीस बहादुरसिंग अकाली, मनसेचे तालुका अध्यक्ष विजय तडस, नामदेव चुटे, प्रशांत ठाकूर, संदीप शिवणकर, निलेश वाघ, दिनेश बावणे, राहुल गावंडे आदी कार्यकर्त्यांसह पाण्याचा टँकर घेऊन दाखल झाले. यावेळी ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली होती. गिरड पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करीत घटनेची नोंद घेतली.(वार्ताहर)
सिलिंडरचा भडका, घर जळून खाक
By admin | Published: May 15, 2016 1:45 AM