लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा: हिवरा तांडा येथील मृत महिला कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रविवारी प्रशासनाने जलद हालचाली करत हिवरा तांडा सहित ७ गावे सील केली. तसेच कोरोनाबाधित महिलेच्या निकट संपर्कात आलेल्या २८ व्यक्तींचे घशाचे स्त्राव घेऊन कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यातील ११ जवळच्या नातेवाईकांना आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.रविवारी सकाळी कोरोना चाचणी अहवाल प्राप्त होताच प्रशासनाच्या वेगवान हालचाली सुरू झाल्या. जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले, यांनी गावात जाऊन गावातील नातेवाईक, नागरिकांशी संवाद साधून माहिती घेतली.तसेच त्यांना खबरदारीच्या उपाययोजनांची माहिती दिली.सील करण्यात आलेल्या ७ गावांमध्ये मृतकाचे नातेवाईक असलेल्या आणि संपर्कात आलेल्या दहेगाव मुस्तफा आणि बोथली या दोन गावानाही प्रतिबंधित करून सील करण्यात आले आहे. आतापर्यंत निकट संपर्कात आलेले 28 व्यक्तींचे स्त्राव घेण्यात आले असून 11 व्यक्तींना उपजिल्हा रुग्णालयात अलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर, परिचारिका यांचेही स्वाब घेण्यात आले आहेत. तसेच रुग्णालय सील करण्यात आले आहे. इतर गावातील संपर्कात आलेल्या 141 व्यक्तींना गृह विलगीकरण करण्यात आले आहे. आंजी मोठी येथील जिनिगसुद्धा सील करण्यात आली आहे. जिनिग मालकाला गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.प्रतिबंधित गावात जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी चमू तैनात करण्यात आल्या आहेत. वेळोवेळी अधिकारी कर्मचारी गावात भेट देऊन उपाययोजनांचा आढावा घेत आहेत.
वर्धा जिल्ह्यातील प्रतिबंधित गावात दहेगाव मुस्तफा आणि बोथलीची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 12:13 PM