लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मे महिना उजाडताच जिल्ह्याच्या ‘डेली पॉझिटिव्हिटी रेट’ तब्बल २१ टक्क्यांवर गेल्याचे लक्षात येताच जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू केले. याच कठोर निर्बंधांच्या काळात केवळ आरोग्यविषयक कामासाठी नागरिक घराबाहेर पडल्याने कोविड विषाणूच्या संसर्गाला ब्रेक लावण्यात जिल्हा प्रशासनाला बऱ्यापैकी यश आल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. शनिवारी जिल्ह्यात १ हजार ८४० व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी २३५ व्यक्तींचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला असून शनिवारी डेली पॉझिटिव्हिटी दर १२.७७ असल्याचे सांगण्यात आले.नवीन कोविडबाधित सापडण्याची गती वाढल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या अडचणीत भर पडली होती. इतकेच नव्हे तर सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील कोविड रुग्णालयातील साधारण रुग्ण खाटाही फुल झाल्याने आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत होत्या. कुठल्याही कोविडबाधिताचा उपचाराअभावी मृत्यू होऊ नये यासाठीची तयारी तसेच झपाट्याने वाढत असलेल्या कोविड संसर्गाला ब्रेक लावण्याच्या हेतूने जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात सुरुवातीला पाच दिवस कठोर निर्बंध लागू केले; पण या पाच दिवसांत पाहिजे तसे यश न आल्याने कठोर निर्बंधांच्या काळात १८ मे सकाळी ७ पर्यंत वाढ करण्यात आली आहे. शहरी व ग्रामीण भागात कठोर निर्बंधांच्या नियमावलीचे नागरिकांकडून स्वयंस्फूर्तीने पालन झाल्याने मे महिन्याच्या पहिल्या सात दिवसांत २१ टक्क्यांवर पोहोचलेला डेली पॉझिटिव्हीटी दर १५ मे रोजी थेट १२.७७ टक्क्यांवर आला आहे. तशी नोंदही आरोग्य विभागाने घेतली असल्याचे सांगण्यात आले.
तिसऱ्या लाटेसाठीच्या उपाययोजना कागदावरच?
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना सळो की पळो करून सोडले. शिवाय जिल्ह्यात लिक्विड ऑक्सिजन तसेच विविध औषध तुटवड्याच्या झळा सोसाव्या लागल्या. या विदारक परिस्थितीला आरोग्य यंत्रणेतील अधिकारी तोंड देत असतानाच तज्ज्ञांकडून कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. असे असले तरी अद्याप वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी आयसीयू आणि व्हेंटिलेटर खाटांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेसाठीच्या उपाययोजना कागदावरच काय, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील व्हिडिओ झाला सोशल मीडियावर व्हायरल- जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसीयू आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था नसल्याने गंभीर कोविडबाधितांचे कसे हाल होत आहेत, याची माहिती देणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फेसबुकवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर अनेक व्यक्ती आपले मत मांडून जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दुर्लक्षित धोरणाचा निषेधही नोंदवीत आहे. त्यामुळे या रुग्णालयात कोविडबाधितांसाठी आयसीयू आणि व्हेंटिलेटरची वेळीच सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.