वर्धा: ओडिशा राज्यातील जगन्नाथपुरी येथे आंतरराष्ट्रीय मायापुरी नृत्य महोत्सवाचे आयोजनातील महोत्सवामध्ये वर्ध्यातील कथ्थक नर्तक चंद्रकांत सहारे यांनी कलाविष्कार करून अनेकांना भुरळ घातली. त्याच्या या नृत्याने परीक्षकांचीही मने जिंकली. याकरिता त्याला मान्यवरांच्या हस्ते ‘नृत्य मायारत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
जगन्नाथपुरी येथील अन्नपूर्णा थिएटरमध्ये आयोजित मायापूर नृत्य महोत्सवात देशभरातील शास्त्रीय कलाकारांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये वर्ध्यातील शास्त्रीय नृत्य कलाकार चंद्रकांत सहारे सहभागी होऊन कथ्थक नृत्य सादर केले. या नृत्यप्रकारामध्ये त्याने यश संपादन केले. त्याला एस. जे. सरतदास, धनंजय मोहंती, भागीरथी नायक, मायापुरी नृत्य महोत्सवाचे व्यवस्थापक नृत्यकार एस. जे. उपेंद्र शर्मा या मान्यवरांच्या हस्ते ‘नृत्य मायारत्न पुरस्कार’ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. नृत्यकार चंद्रकांत हा गुरू किरण खडसे यांच्या मार्गदर्शनात नृत्याचे धडे घेत असून, नृत्याचे प्रथम शिक्षण देणारे नृत्यगुरू स्व. योगेंद्र कावळे यांना हा पुरस्कार समर्पित केल्याचे सांगितले.
युवा कला गौरव पुरस्कार
नृत्यकार चंद्रकांत हा चित्रकलेत पारंगत असून, त्याने कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातून चित्रकलेचे शिक्षण घेतले आहे. राष्ट्रीय स्तरावरील चित्र प्रदर्शनामध्ये अनेक चित्रे व पेंटिंग्ज लावल्या आहेत. उत्कृष्ट चित्रकार व रांगोळी कला याकरिता नुकताच महाराष्ट्र शासनाचा ‘युवा कला गौरव पुरस्कार’ देऊन आर्ट बिट्स पुणे यांच्याकडून सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी सिंगापूरला झालेल्या इंटरनॅशनल डान्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
------------------------------------