वर्धा: नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने पुढील दोन दिवस जिल्ह्याचा पारा दोन अंशाने वाढण्याचा इशारा दिला. तसेच ७ ते १० मेपर्यंत जिल्ह्यात एक ते दोन ठिकाणी पुन्हा विजांच्या कडकडाटासह गारपीट अथवा वादळी पाऊस होण्याचाही इशारा दिला आहे.
नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने सूचना जारी केली. त्यानुसार येत्या ४८ तासांत जिल्ह्याचा कमाल पारा दोन अंशांनी वाढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे हा पारा ४४ अंशाच्या पार जाण्याची शक्यता बळावली आहे. त्यानंतर पुन्हा पारा दोन ते तीन अंशानी खाली येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अर्थात ५ ते ७ मेपर्यंत पारा ४४ अंशाच्या आसपास राहू शकतो. त्यानंतर तो खाली येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या या इशाऱ्यामुळे पुढील काही दिवस सावधान राहण्याची गरज आहे. अन्यथा उन्हात फिरणे अंगलट येऊ शकते.
हवामान विभागाने ६ मे रोजी जिल्ह्यात वातावरण कोरडे राहण्याची, तर ७ ते ९ मेपर्यंत जिल्ह्यात एका, दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट, वादळी पाऊस होण्याचीही शक्यता वर्तविली आहे. तसेच १० मे रोजी काही भागात तुरळक पाऊस, तर ११ मे रोजी पुन्हा वातावरण कोरडे राहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. हवामान विभागाच्या या इशाऱ्यामुळे धोका वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सतत अवकाळी वादळी पाऊस बरसत असल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. उन्हाळी पिकांना फटका बसत आहे. टरबूज, संत्रा, पपई, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. आता पुन्हा हवामान विभागाने गारपीट, वादळी पावसाचा इशारा दिल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. वाऱ्याचा वेगही वाढणार७ ते ९ मे दरम्यान जिल्ह्यात वाऱ्याचा वेगही वाढणार आहे. ७ आणि ८ मे रोजी जिल्ह्यात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारा वाहणार आहेत. ९ मे रोजी वाऱ्याचा वेग थोडा मंदावणार आहे. या दिवशी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारा वाहणार आहे. गारपीट, वादळ आणि पावसाच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांची मात्र झोप उडाली आहे. तथापि, पाऊस आल्यास नांगरणी काही प्रमाणात सुकर होण्याची शक्यता आहे.