पुलगावातील प्रकार : रस्त्यावर थाटले व्यवसाय, अतिक्रमणातील घरांना महावितरणने दिले मिटर लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी नगर पालिका प्रशासन तथा नागरिकांची आहे; पण पुलगाव शहरात दोघेही ही जबाबदारी झटकत असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शहरात सर्वत्र अव्यवस्थेचे दर्शन होत असून रस्त्यांवरच व्यवसाय थाटल्याचे दिसते. अतिक्रमणात घरे असलेल्यांना महावितरणने विद्युत मिटर पुरविले आहे. हा प्रकार अव्यवस्थेला निमंत्रण देणारा ठरत आहे. पुलगाव शहरातील रामनगर, भीमनगर, पाण्याची टाकी या परिसरात अव्यवस्थेचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. पालिका प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी नाचणगाव नाका ते पाण्याची टाकी या रस्त्याचे सिमेंटीकरण केले. सध्या या मार्गावर सर्वत्र अतिक्रमण बोकाळल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी महावितरणच्या भिंतीच्या शेजारीच घरे बांधली आहेत. याच परिसरात दुकाने थाटली आहे. रस्त्यावर गाई-म्हशींचा गोठा, भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय केला जात असल्याचे पाहावयास मिळते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झालेल्या या अतिक्रमणामुळे रूंद सिमेंट रस्ताही रहदारीस अपूरा पडू लागला आहे. पाण्याच्या टाकीजवळ तर घाणीच्या साम्राज्याने चिमुकल्यांसह नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. सार्वजनिक शौचालयाजवळ पाणी साचलेले असते आणि याच भागात भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय भर रस्त्यात मांडण्यात आला आहे. यामुळे पायी चालणाऱ्यांना तर कसरतच करावी लागते. वाहन धारकांनाही ये-जा करण्याकरिता जागा राहत नाही. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे. सिमेंट रस्ता झाला वाहनतळ, गुरांचा गोठा व भंगार खरेदी केंद्र नाचणगाव नाका ते पाण्याच्या टाकीपर्यंतच्या रस्त्याला वाहनतळाचे स्वरूप आले आहे. सर्वांची चार चाकी वाहने रस्त्याच्या बाजूला उभी केली जातात. यामुळे रस्त्याला वाहन तळाचे स्वरूप आले आहे. शिवाय गुरेही रस्त्यावरच बांधली जात असून मलमुत्रामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते. याच मार्गावर समोर भंगार खरेदी-विक्रीचे दुकान थाटण्यात आले आहे. या प्रकारामुळे हा परिसर गलिच्छ झाल्याचे दिसून येते. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून अतिक्रमण मोठ्या प्रमाणात बोकाळले आहे. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
अव्यवस्थेमुळे शहरात घाणीचे साम्राज्य
By admin | Published: July 12, 2017 2:06 AM