विनोद घोडे ।लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : नजीकच्या पडेगाव येथील अरुण रामाजी नागोसे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी डॉ. राजेश सरोदे यांचे रुग्णालय गाठले. डॉ. सरोदे यांच्या सल्ल्यानेच वर्धेतील राधा कंम्यूटराईज पॅथालॉजी लॅबमध्ये रक्त नमुने घेण्यात आले. त्याच्या प्राप्त झालेल्या अहवालात रुग्ण अरुण नागोसे यांना डेंग्यूची लागण झाल्याचे हायलाईट करून देण्यात आले. त्या अहवालावरून डॉक्टरांनीही अरुणला डेंग्यूची लागण झाल्याचे सांगितले. परंतु, आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने अरुण सेवाग्राम येथील रुग्णालयात गेला. तेथेही रक्ताचे नमुने घेण्यात आले. परंतु, तेथील अहवालात डेंग्यूची लागणच झाली नसल्याचे नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांकडून डेंग्यूचा धाक दाखवून रुग्णांची पिळवणूक तर केली जात नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्ह्यात सध्या डेंग्यू सदृष्य आजाराने थैमान घातले आहे. नजीकच्या केळापूर येथे डेंग्यूची लागण होऊन नुकताच एका २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान झाला. दिवसेंदिवस डेंग्यू हा आजार डोके वर काढत असल्याने नागरिकांमध्येही डेंग्यू बाबत कमालीची दहशत असल्याचे चित्र बघावयास मिळते. काही खासगी डॉक्टर सामाजिक बांधिकी जोपासत डेंग्यूला हद्दपार करण्यासाठी जनजागृती करीत आहे. परंतु, काही खासगी डॉक्टर डेंग्यूचा धाक दाखवून रुग्णांची आर्थिक पिळवणूकच करीत असल्याचे सदर प्रकारावरून दिसून येत आहे.पढेगाव येथील अरूण नागोसे हे प्रकृती अस्वस्थ असल्याने वर्धा येथील डॉ. राजेश सरोदे यांच्या रुग्णालयात गेले. त्यांनी सुरूवातीला रुग्ण तपासणी करून रक्त नमुने तेजश्री राजेश सरोदे यांच्या मालकीच्या राधा पॅथलॉजी लॅबमध्ये देण्यासाठी पाठविले. त्यासाठी त्यांच्याकडून नियोजित शुल्कही आकारण्यात आले. त्यानंतर ब्लड रिपोर्ट आल्यावर डॉक्टरांनी रुग्ण अरुणला तुला डेंग्यूची लागण झाल्याचे सांगितले. त्यामुळे अरुण पुरता हादरला. शिवाय आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने तो डॉ. राजेश सरोदे यांच्या क्रिष्णा हॉस्पीटलमध्ये दाखल न होता त्याच दिवशी तो सेवाग्राम येथील कस्तुरबा हॉस्पीटलमध्ये गेला. तेथे पुन्हा त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भरती करून घेत त्याच्या रक्ताने पुन्हा नमुने घेत ते तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविले. उल्लेखनिय म्हणजे त्या अहवालात डेंग्यू निगेटिव्ह असल्याचे नमुद करण्यात आले आहे. सेवाग्राम येथील रुग्णालयात १८ आॅगस्टला भरती केलेल्या अरुणच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्याला तेथील वैद्यकीय अधिकाºयांनी २२ आॅगस्टला सुट्टी दिली आहे. या प्रकरणाची जिल्हा प्रशासनातील आरोग्य विभागाने दखल घेत चौकशी करून दोषी डॉक्टरावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अरूण नागोसे यांनी केली आहे.माझ्याकडे अरूण नागोसे (५०) रा. पढेगाव हा रुग्ण तपासणीकरिता आला होता. प्रथम तपासणीमध्ये डेंग्यू पॉझीटीव्ह असल्याचे रक्ताच्या तपासणीद्वारे दिसून आले. पुन्हा तपासणी करायची होती; पण तो रुग्ण आमच्या हॉस्पीटलला भरती झाला नाही. त्यामुळे दुसरी तपासणी करता आली नाही.- डॉ. राजेश सरोदे, क्रिष्णा हॉस्पीटल, वर्धा.
डेंग्यूच्या नावावर आर्थिक पिळवणुकीचा प्रयत्न?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:39 PM
नजीकच्या पडेगाव येथील अरुण रामाजी नागोसे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी डॉ. राजेश सरोदे यांचे रुग्णालय गाठले. डॉ. सरोदे यांच्या सल्ल्यानेच वर्धेतील राधा कंम्यूटराईज पॅथालॉजी लॅबमध्ये रक्त नमुने घेण्यात आले.
ठळक मुद्देदोन रुग्णालयांच्या रक्त नमुने अहवालात कमालीची तफावत