वर्धा : आर्वी तालुक्यातील सालफळ घाटातून भर दिवसा चक्क जेसीबीद्वारे रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. जेसीबीने वाळू उपसून ट्रकमध्ये भरली जात आहे. मात्र, यंत्रणा डोळे लावून बसली आहे. परिणामी, रेती तस्करांना रान मोकळे झाले आहे.
आर्वी तालुक्यातील सालफळ परिसरातून वर्धा नदी वाहते. या नदी पात्रात मोठ्या प्रमाणात रेती आहे. त्यावर तस्करांचा डोळा गेला आहे. सालफळ घाटाचा लिलाव झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र, चक्क जेसीबीने वाळू उपसा केला जात आहे. ही रेती डेपोत न नेता परस्पर तिची विल्हेवाट लावली जात असल्याची चर्चा आहे. महिनाभरापूर्वी पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली होती. २३ वाहनचालकांना अटक केली होती. १० टिप्पर व एक जेसीबी जप्त केला होता. मात्र, वाहनमालक मोकाट होते. त्यावेळी काही दिवस रेतीचोरी बंद होती. मात्र, लगेच काही दिवसांनी पुन्हा रेतीउपसा सुरू झाला. आता तर रात्री नव्हे तर चक्क दिवसाच जेसीबीने रेतीउपसा सुरू असल्याचे दिसून येत आहे. साेमवार, ६ मे रोजी सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास चक्क जेसीबीने रेती उपसून ट्रकमध्ये भरली जात असल्याचे दिसून आले. काही ट्रक, टिप्पर नदी पात्रात रेती भरण्यासाठी रांग लावून होते.
मागीलवेळी कारवाईदरम्यान आठ टिप्पर मालकांची नावे आरटीओने तहसील कार्यालयाकडे दिली होती. त्या टिप्पर मालकांवर दंडात्मक कार्यवाही झाली की नाही, ही बाबही अद्याप गुलदस्त्यातच आहे. आता तर वारेमाप वाळूउपसा सुरू असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते. परिसरातील नागरिकांना रेतीची होणारी खुलेआम लूट दिसत आहे. मात्र, यंत्रणा मूग गिळून बसल्याची चर्चा आहे. त्यामुळे यंत्रणेचे रेती चोरट्यांशी ‘अर्थपूर्ण’ संबंध तर नाही ना, अशी शंका नागरिक व्यक्त करीत आहे.
रोहणा येथे डेपोही नाही, मग रेती जाते कुठे?मागील वर्षी रोहणा येथे रेती डेपो होता. यंदा मात्र हा डेपो नाही. तरीही रेती उपसा होत आहे. त्यामुळे घाटातून उपसलेली रेती नेमकी जाते कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही रेती पुलगाव, आर्वी, वर्धासह इतरही ठिकाणी जात असल्याचे सांगितले जाते. याशिवाय हिंगणघाट तालुक्यातील धोच्ची रेती घाटातूनही रेती तस्करी सुरू असल्याची माहिती आहे. रेतीचा उपसा करून प्रथम किनाऱ्यावर साठा केला जातो. नंतर दररोज १० ते १२ टिप्परने ही रेती यवतमाळ जिल्ह्यात वाहून नेली जात असल्याची चर्चा आहे. याशिवाय ही रेती ट्रक्टरद्वारे येरला, पोहणा, वडनेर, शेकापूर, गंगापूर, डोर्ला आदी परिसरातही पोहोचविली जात असल्याची चर्चा आहे.
सालफळ घाटातून जेसीबीने रेतीचा उपसा सुरू असल्याची माहिती सोमवारी मिळाली. त्यावरून लगेच महसूल पथकाला तेथे रवाना करण्यात आले. मात्र, पथकाला घटनास्थळी जेसीबी आढळला नाही. अद्याप तेथे आमचे पथक ठाण मांडून आहे.- हरिश काळे, तहसीलदार, आर्वी.