प्रवाशांना दिलासा : नागरिकांनीच घेतला पुढाकारआकोली : जिल्ह्यातील अनेक प्रवासी निवाऱ्यांची देखभाल दुरुस्ती अभावी वाताहात झालेली दिसून येते. याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. बसची प्रतीक्षा करताना प्रवाशांना उन्ह, वारा, पाऊस याचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रवासी निवारे केवळ नाममात्र असल्याचे दिसून येते. प्रवाशांनी वारंवार मागणी करूनही आकोली येथील निवाऱ्याची दुरुस्ती केली नाही. अखेर स्थानिक व्यावसायिक व ग्रामस्थांच्या सहकार्याने येथील प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती करण्यात आली. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. येथील प्रवासी निवारा साप, विंचवांचे आश्रयस्थान झाला होता. त्यामुळे प्रवासी येथे बसण्यास घाबरत होते. शासनस्तरावर निवाऱ्याची दुरुस्ती करण्याबाबत कोणतेही नियोजन नव्हते. अखेर येथील शेख दस्तगीर यांच्या पुढाकाराने प्रवासी निवाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले. त्यामुळे येथील प्रवासी निवारा प्रवाशांना बसण्यायोग्य झाला आहे. दुरवस्थेमुळे येथे गैरप्रकारला उधाण आले होते. गावातील प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती होत नसल्याचे पाहुन येथील शेख दस्तगीर, मनोज सुटे, रूपेश घोडखांदे, अब्बासभाई, शेख कासीन, सहदेव अनकर, कवडु नरताम यांनी श्रमदान केले. व्यावसायिकांनी यात हातभार लावून ग्रामस्थांची अडचण सोडविण्यात सहकार्य केले.(वार्ताहर) व्यावसायिकांचे सहकार्य येथील प्रवाशी निवारा गावाबाहेर फर्सांगभर अंतरावर आहे. शाळकरी मुले, प्रवासी महिला, रुग्ण यांना हॉटेलचा आडोसा घ्यावा लागत होता. प्रवाशी निवाऱ्यातील ओटा खस्ताहाल झाला होता. अनेकदा प्रवाशांना साप व विंचवाचे दर्शन होत होते. त्यामुळे कुणीही प्रवाशी निवाऱ्यात बसत नव्हते. प्रवाशी निवाऱ्यांची एवढी दैनावस्था झाली की, प्रवाशी बसत नसल्यामुळे कडबा, कुटार ठेवण्याकरिता त्याचा वापर केला जातो.
अखेर ‘त्या’ प्रवासी निवाऱ्याचे दिवस पालटले
By admin | Published: September 05, 2016 12:42 AM