पुरुषोत्तम नागपुरे
वर्धा : बारावी उत्तीर्ण झाल्यावर डीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करून अनेक युवक प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले आहेत. आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार डीएड महाविद्यालये बंद होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे डीएड महाविद्यालय कालबाह्य होणार असल्याने डीएड झालेल्यांना मोठा धक्का बसला आहे. आता बीएड पदवी अभ्यासक्रम नव्याने तयार होणार असून, तो चार वर्षांचा राहणार असल्याने याचा शिक्षणावर दूरगामी परिणाम होणार, असे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
नव्या शैक्षणिक धोरणानुसार राज्यात शिक्षक-प्रशिक्षणाचे टप्पे बदलणार आहेत. याची महाराष्ट्र राज्यात लवकरच प्रभावी अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यानुसार आता डीएड अभ्यासक्रम कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता बोलून दाखविली जात आहे. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर चार वर्षांचा बीएड इंटिग्रेटेड अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तसेच तीन वर्षांची बॅचलर डिग्री पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना २ वर्षांचा बीएड इंटिग्रेटेड अभ्यासक्रम करता येईल. यानंतर मात्र त्यालाच शिक्षक होता येणार आहे. अध्यापनशास्त्रातील नवनव्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच नव्या शैक्षणिक बाबींचा या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमात समावेश केला जाणार असल्याने शैक्षणिक क्षमतेत वैविध्यपूर्णता आणि नावीन्यपूर्णता येणार आहेत. अर्थात या सर्वसमावेशक अभ्यासक्रमात विशेषत: शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणतज्ज्ञांनी दिली.
डीएडधारकांचा प्रश्न सोडवावा
नवे शिक्षक प्रशिक्षण टप्पे कधी सुरू होणार यासंदर्भात महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने अधिकृतरीत्या जाहीर केले नाही याचे आश्चर्य वाटत आहे. येत्या २०२३-२४ च्या शैक्षणिक वर्षापासून त्यांची अंमलबजावणी करण्याबाबत चाचपणी सुरू झाल्याची माहिती पुढे येत आहे. असे असले तरी पूर्वी डीएड अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांचा प्रश्न सोडविण्याकरिता सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी डीएडधारकांनी केली आहे.
नवीन शैक्षणिक धोरणात सर्वसमावेशकपणा गृहीत धरला असता, शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक घटकाला, विद्यार्थ्यांना, डिप्लोमाधारकांना न्याय मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे जुन्या डीएडधारकांवर अजिबात अन्याय होता कामा नये. महाराष्ट्रातील जुने डीएडधारक लाखोंच्या वर असल्याने शिक्षक म्हणून त्यांची वर्णी लागावी. कारण उमेदीच्या शेवटच्या वयात या जुन्या डीएडधारकांची शिक्षक म्हणून निवड झाल्यास बेरोजगारीचा प्रश्न मिटेल.
अविनाश टाके, शिक्षक
महाराष्ट्र राज्यात येत्या शैक्षणिक सत्रापासून नवीन शैक्षणिक धोरण राबविण्याचा शासनाचा निर्णय स्तुत्य असला तरीही डीएड झालेल्या बांधवांना शिक्षकांची नोकरी लागावी म्हणून शासनाने पर्यायी व्यवस्था करून या बेरोजगार युवकांना न्याय मिळवून द्यावा. टीईटीची अट जुन्या शिक्षकांना शिथिल करून त्यांना शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात काही हरकत नाही. आजही हे शिक्षक बीएड झाले असतानासुध्दा त्यांना हाताला धड काम नाही. शासनाने उचित व क्रांतिकारक शैक्षणिक निर्णय घेऊन जुन्या डीएडधारकांना न्याय मिळवून द्यावा.
मंगेश कोल्हे, शिक्षक
----------------------------------------------