खरांगणा (माे.) : नजीकच्या दिघी मौजा परिसरातील पानवाडी शिवारात बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने, परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच, वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेत, पंचनामा व उत्तरीय तपासणीअंती बिबट्याच्या मृतदेहाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली.
पानवाडी येथील शेतकरी भारत ठाकरे यांच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत असल्याचे लक्षात येताच, गावातील सुजाण नागरिकांना माहिती देण्यात आली. त्यानंतर, पोलिस पाटील नवशाद अली यांनी वनविभागासह पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच, वनविभागाचे अधिकारी बोबडे, जंगले, पोलिस विभागाचे फडणवीस, विठ्ठल केंद्रे आदींनी घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनास्थळी पोहोचलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे अडीच वर्षीय नर बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेत, पंचनामा केला, शिवाय आर्वी, आंजी व विरुळ येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून, मृत बिबट्याची उत्तरीय तपासणी केली. कायदेशीर सर्व प्रक्रिया झाल्यावर बिबट्याच्या मृतदेहाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.