वर्धा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसीयुमध्ये असलेल्या एका शौचालयात अर्भक मृतावस्थेत आढळले. ही घटना शुक्रवारी सकाळी उघड झाली. या प्रकरणी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री २ वाजताच्या सुमारास एक महिला प्रसवकळा येत असल्याने दाखल झाली. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला सेवाग्राम येथे नेण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान तिला लघुशंका आल्याने ती येथील शौचालयात गेली. याच वेळी तिची प्रसूती झाली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी तिच्यावर प्रथमोपचार करून तिला सेवाग्राम रुग्णालयात पाठविण्यात आले. याच काळात तिची प्रसूती झाली. हा प्रकार यावेळी उपस्थित असलेल्या वैद्यकाय अधिकाऱ्यांना कळला नाही याचेच नवलं. सदर अर्भक पाच महिन्याचे असल्याचे सांगण्यात येत आहे. एक महिला जिल्हा सामान्य रुग्णालयात येते, तिची वैद्यकीय अधिकारी तपासणी करतात. कालांतराने तिची प्रसूती होते, यानंतर पुन्हा तिची तपासणी होती. यातही वैद्यकीय अधिकाऱ्यांना तिची प्रसूती झाल्याचे कळत नाही. यामुळे रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण होत आहे. या प्रकरणी शहर ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे.(प्रतिनिधी)
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शौचालयात मृत अर्भक
By admin | Published: February 28, 2015 12:18 AM