लोकमत न्यूज नेटवर्कठाणेगाव : पाण्याचा झरा पाहण्यासाठी विहिरीत उतरलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर दरड कोसळल्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. विशेषत: लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच ही घटना घडल्याने ठाणेगावात शोककळा पसरली.दीपक गोकुळराव डांगे (४२) रा. ठाणेगाव असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या शेतातील विहिरीचा गाळ काढण्याचे काम सुरु होते. मजुरांनी गाळ काढल्यानंतर विहिरीत लागलेला पाण्याचा झरा पाहण्यासाठी दीपक डांगे विहिरीत उतरले. त्याचवेळी काळाने त्यांच्यावर झडप घातली. विहिरीत उतरताच विहिरीच्या काठावरील दरड त्यांच्या अंगावर कोसळली. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. मजुरांनी लगेच त्यांना बाहेर काढून कारंजा (घा.) येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी करुन मृत घोषीत केले.त्यांच्या पश्चात आई, पत्नी,मुलगा-मुलगी, दोन बहिणी, एक भाऊ असा आप्त परिवार आहे. या प्रकरणी पोलीसांनी नोंद केली असून पुढील तपास कारंजा (घा.) पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक शेटे करीत आहे.
पंधरा दिवसातील दुसरी घटनाडांगे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पंधरा दिवसापूर्वी दीपक डांगे यांचा लहान भाऊ दिनेश डांगे (३८) यांचा आजाराने मृत्यू झाला. त्यांची तेरावी आटोपताच दीपक यांचाही अपघाती मृत्यू झाल्याने डांगे परिवाराला मोठा हादरा बसला आहे. दीपक हे परिवारातील प्रमुख असल्याने मोठा आधार हिरावला आहे. अख्खा परिवारच उघडल्यावर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.