लोकमत न्यूज नेटवर्कविजयगोपाल : नजीकच्या इंझाळा शिवारात गोटफार्मवर चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात राखणदाराचा मृत्यू झाला.इंझाळा येथील शेतकरी मंगेश भानखेडे यांनी गावाला लागूनच असलेल्या शेतात बँकेकडून कर्ज घेत गोटफार्म सुरू केले. या गोटफार्मवर गावातीलच श्रावण पंधराम (७५) हे राखणदार म्हणून काम करीत होते. बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास मंगेश भानखेडे आपल्या शेतात त्यांचा जेवणाचा डबा व कुत्र्यांसाठी भाकरी घेऊन गेले असता त्यावेळेस त्याठिकाणी तीन ते चार जण दिसले. शेतामध्ये कुणीतरी आले म्हणून चोरटे सैरावैरा पळू लागले. त्यातील एका चोराला शेतातील विहीर न दिसल्याने तो त्या विहिरीमध्ये पडला. त्याने बचावाकरिता आरडाओरड केली. शेतमालकाला विहिरीत आपलाच राखणदार पडला असावा, असा भास झाला. त्यामुळे शेतमालकाने राखणदार म्हणून चोरट्यालाच बाहेर काढले. दरम्यान, हा चोरटा बकऱ्या चोरीच्या उद्देशाने शेतात आला असावा आणि कुणी आल्याची चाहूल लागल्याने पळून जाण्याच्या बेतात असतानाच विहिरीत पडला. चोराला विहिरीबाहेर काढल्यानंतर पकडून ठेवले व आपल्या भावाला फोन करण्याकरिता मोबाईल काढत असताना विहिरीत पडलेल्या चोरांनी हाताला झटका मारून पळ काढला. पण, तो चोर पळून जाण्यास यशस्वी झाला. तेव्हा शेतमालकाने चौकीदार श्रावण पंधराम यांचा शोध घेतला असता जखमी अवस्थेत ते पडून दिसले. गावातील लोकांच्या मदतीने त्यांना सावंगी येथील रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. मंगेश भानखेडे यांच्या तक्रारीवरून ३०७ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला, पण उपचादरम्यान राखणदाराचा मृत्यू झाल्याने त्यात पुन्हा ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रात्रीच या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. गुरुवारी सकाळी पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले. श्वानांनी विजयगोपालकडे जाणाºया नाल्यापर्यंत मार्ग दाखविला. पण, पोलिसांना चोरापर्यंत पोहोचण्यात अद्याप यश आलेले नाही.
चोरट्यांच्या हल्ल्यात राखणदाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 9:37 PM
नजीकच्या इंझाळा शिवारात गोटफार्मवर चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात राखणदाराचा मृत्यू झाला.
ठळक मुद्देइंझाळा येथील शेतातील घटना : श्वानपथक दाखल