नरसापूर येथे डेंग्यूचे थैमान : आरोग्य विभागाच्या चमूकडून पाहणी आष्टी (शहीद) : तालुक्यातील नरसापूर येथे डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. या गावातील आठ जणांच्या रक्तनमुन्यांची तपासणी केली असता त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले. त्यांच्यावर अमरावती येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. यात शनिवारी अजय विघ्ने (२२) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे आतापर्यंत झोपेत असलेल्या स्थानिक आरोग्य विभागाचे कर्मचारी खडबडून जागे झाले. त्यांच्याकडून परिस्थितीवर ताबा मिळविण्याचे प्रयत्न होत असल्याचे केवळ सांगण्यात येत आहे. नरसापूर गटग्रामपंचायतची लोकसंख्या २१० आहे. एकूण ४५ घरांच्या वस्तीमध्ये गत अनेक दिवसांपासून नाल्या उपसल्या नाही. घाणीमुळे डासांची पैदास वाढली. त्यातच दुषित पाणीपुरवठा झाल्यामुळे नागरिकांना ताप, उलट्यांचा त्रास सुरू झाला. एकापाठोपाठ आठ जणांची प्रकृती बिघडली. यामध्ये अजय विघ्ने (२२), ममता विघ्ने (१८), प्रतिभा गिराळे (१७), पुनम गिराळे (१८), राहुल गिराळे (२४), अर्पण विघ्ने (२२), पायल महल्ले (१४), पायल विघ्ने (१४) यांचा समावेश आहे. या सर्वांना अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले. तेथील डॉक्टरांच्या तपासणीत यांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले. दरम्यान, शनिवारी अजय विघ्ने याला दुपारी ३ वाजता पोटात दुखायला लागले. तो आधीच तापामुळे फणफणत होता. डॉक्टरांनी प्रयत्न करून अजयला उपचार दिले. मात्र त्याचा मृत्यू झाला. अजयचा मृत्यू गावात डेंग्यूची साथ परसरल्याचे सांगून गेला. यामुळे झोपेत असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाला जाग आली. याची माहिती ग्रामसेवक आर.वाय. पठाण यांना मिळातच त्यांनी गावातील सबंध नाल्या उपसण्याची मोहीम राबविली. विहिरीत ब्लिचींग पावडर टाकले, फवारणी व धुरळणी करण्यासाठी औषध आणले. आरोग्य विभागाची चमू गावात आली. पाणी व रक्ताचे नमुने घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले. अहवाल प्राप्त झाल्यावर आणखी उपाययोजना करणार असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. हिच मोहीम पहिले राबविली असती तर अजयचा मृत्यू झाला नसता असे गावात बोलले जात आहे. गावात डेंग्यूने थैमान घातल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांना मिळाल्यावर त्यांनी आठ कर्मचाऱ्यांची चमू गावात पाठविली. यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस.एस. रंगारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. झरकर, आरोग्य सहायक वांगे, राठोड, सेविका भगत, कर्मचारी घारडे, दंडाळे, ढोले यांच्या पथकाने घरोघरी भांड्यामध्ये औषध टाकून पाणी स्वच्छ केले आहे. गावातील ही परिस्थिती आटोक्यात आणण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)
एकाचा मृत्यू; सात रुग्णालयात
By admin | Published: October 05, 2014 11:09 PM