उन्हाचा तडाखा अन् पाण्याचा अभाव पक्ष्यांच्या जीवावर : सामाजिक संघटनांच्या आवाहनानंतरही स्थिती दयनियच लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : उन्हाचा पारा चढत असल्याने पक्ष्यांकरिता छतावर पाणी ठेवण्याचे आवाहन अनेक सामाजिक पक्षी प्रेमी आणि सामाजिक संघटनांच्यावतीने करण्यात होते. यानुसार जिल्ह्यात काम सुरू आहे; पण ते तोकडेच पडत असल्याचे सेलू काटे येथे घडलेल्या घटनेवरून दिसून आले. येथे पाण्याच्या शोधात असलेल्या एका चिमणीसह घुबडाला तहाणेने व्याकूळ होवून तडफडून जीव गमवावा लागला आहे. येथील शेतकऱ्याच्या शेतातील झाडाखाली चिमणी मृतावस्थेत दिसून आली. तर काही अंतरावर दोन दिवसांपूर्वी झाडाच्या कपारीत लपलेले घुबड बाहेर मृतावस्थेत आढळले. हे दोन्ही पक्षी तहाणेने गतप्राण झाल्याचा अंदाज आहे. या उन्हाळ्यात जिल्ह्यात पाऱ्याने सर्वांना चांगलेच होरपळून काढल्याने असे प्रकार जिल्ह्यात किती घडले असतील, याचा अंदाज लावणे कठीण आहे. यामुळे सामाजिक बांधिलकीची शिकवण देणाऱ्या वर्धेकरांना नव्या जोमाने सुरुवात करण्याची वेळ आल्याचे यावरून जाणवत आहे. केवळ पक्षीच नव्हे तर पाण्याकरिता जंगलातील इतर वन्यप्राण्यांचीही भटकंती होत आहे. जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे या वन्यप्राणी गावांकडे धावत आहे. ज्या शेतात ओलिताची सोय आहे, अशा शेतात त्यांचा मोर्चा अधिक असतो. या प्राण्यांचे कळप पाण्याच्या शोधात शेतात येत असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत असल्याचे दिसून आले आहे. यावर मार्ग काढण्याकरिता या प्रभागातील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जंगल परिसरात पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. चिऊताईकरिता छतावर ठेवलेला दाना अन् पाणी गेले कुठे ? जिल्ह्यातील वन्यजीव अभ्यासक, पक्षी प्रेमी आणि विविध सामाजिक संघटनांकडून चिऊताईकरिता घराच्या छतावर, बालकणीत पाणी ठेवण्याचा उपक्रम राबवित आहेत. यात अनेकांकडून सहभागी होत असल्याचे सोशल नेटवर्कींगवर अपलोड केलेल्या फोटोवरून दिसत आहे. अशात पक्ष्यांचा पाण्याअभावी जीव गेल्याने अनेकांकडून ठेवण्यात आलेले पाणी अन् दाना गेला तरी कुठे असा, प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. यामुळे प्रत्येकाने जबाबदारी म्हणून दाना अन् पाणी देत या पक्ष्यांना जपण्याची गरज आहे. जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटले जंगलात असलेल्या नैसर्गिक पाणवठ्यांवर जंगलातील प्राण्यांची तहाण आहे. हे पाणवठे आटले तरी या प्राण्यांकरिता वनविभागाकडून कृत्रिम पाणवठे निर्माण केले आहेत; पण त्यांच्याकडून या पाणवठ्यात पाणी टाकले जात नसल्याने की काय, पाण्याच्या शोधात या वन्यप्राण्यांची धाव परिसरात ओलित असलेल्या शेतकऱ्यांच्या शेताकडे असते. पाण्यासह या वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचीही नासाडी होते. सेलू काटे येथील सुनील हिवंज या शेतकऱ्याच्या शेतात रात्री आणि सकाळच्या प्रहरी हरिण, माकड, रोही, डुक्कर आदी प्राणी बघावयास मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
पाण्याच्या शोधात चिमणी आणि घुबडाचा तडफडून मृत्यू
By admin | Published: May 28, 2017 12:24 AM