चौकशीअंती पोलिसांत गुन्हा दाखल आष्टी (शहीद) : सत्तरपूर शिवारात विद्युत लाईनचे काम करण्यासाठी खांबावर चढलेल्या तरुणाचा वीजपुरवठा सुरू होताच धक्का लागल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना ७ सप्टेंबरला घडली असून पोलिसांनी चौकशीअंती मंगळवारी गुन्हा दाखल केला. कमलेश धुर्वे (२३) असे मृतकाचे नाव आहे. कंत्राटदाराकडे वीज दुरुस्तीच्या कामावर कमलेश धुर्वे (२३) रा. दसली जिल्हा बैतुल मध्यप्रदेश हा कार्यरत होता. सत्तरपूर येथे वीज दुरस्तीचे काम सुरू करण्यासाठी कमलेश खांबावर चढला. यावेळी आरोपी किसनसिंग राजपूत (३६) रा. मोर्शी याने दुसऱ्या डीपीवरील वीज पुरवठा सुरू केला. जाणिवपूर्वक पुरवठा सुरू केल्यामुळे कमलेशला विजेचा धक्का बसल्याचा आरोप होता. या कामाच्या ठेकेदाराने याची माहिती वीज कंपनीला न देता कमलेशला परस्पर वरुड येथे उपचारासाठी दाखल केले. त्याचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचे भासविले. या कामाचा कंत्राट मोर्शी येथील ठेकेदाराकडे होता. यासर्व घटनाक्रमाची माहिती तपासादरम्यान मिळाली. याप्रकरणी सद्या ठेकेदाराकडील किसनसिंग राजपूत याच्यावर भादंवी ३०४ (अ) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास बीट जमादार भगवान बावणे, शिपाई राहुल तेलंग करीत आहे. कमलेशच्या कुटुंबाला १० लाखाची नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.(तालुका प्रतिनिधी)
खांबावर वीज दुरुस्ती करताना तरुणाचा मृत्यू
By admin | Published: September 28, 2016 1:40 AM