भाजपच्या जिल्हा बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चाहिंगणघाट : भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक येथील एका मंगल कार्यालयात पार पडली. यात भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती न करण्याचा निर्णय घेऊन स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यासाठी पदाधिकाऱ्यांनी कामाला लागण्याचे आवाहन केले.अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजेश बकाने तर अतिथी म्हणून राज्य महामंत्री डॉ. रामदास आंबटकर, विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, खा. रामदास तडस, आ. समीर कुणावार, आ. डॉ. पंकज भोयर, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, माजी खासदार सुरेश वाघमारे, सुधीर दिवे, जिल्हा सरचिटणीस किशोर दिघे, अविनाश देव, सुनील गफाट, अतुल तराळे, माजी आमदार दादाराव केचे, जि.प. शिक्षण सभापती वसंता आंबटकर, अर्चना वानखेडे आदी उपस्थित होते. गफाट यांनी प्रदेश कार्यकारिणीचा वृत्तांत सादर केला. कार्यकर्ता महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले. दिघे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या नियोजनावर माहिती दिली. तराळे यांनी नगर पालिका निवडणुकीबाबत मार्गदर्शन केले. वानखेडे यांनी महिलांचे आरक्षण व सक्षमीकरण यावर मनोगत व्यक्त केले. बैठकीच्या दुसऱ्या सत्रात आ.डॉ. भोयर यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ तळागाळातील घटकापर्यंत पोहोचवा, असे आवाहन केले. आ. कुणावार यांनी कार्यकर्ता हा सजग व जागृत असावा. बुथ रचना मजबूत असणे गरजेचे असून नवीन कार्यकर्ते जोडताना जुन्या कार्यकर्त्यावर अन्याय होता कामा नये, असे स्पष्ट केले. डॉ. आंबटकर यांनी योग्य नियोजनाची गरज व्यक्त केली. बकाने यांनी मंडळ पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा आढावा घेतला. तत्पुर्वी समाधान शिबिराचे जनक म्हणून राज्य शासनाने गौरविल्याबद्दल आ. कुणावार यांचा सत्कार करण्यात आला. खा. तडस, डॉ. कोठेकर यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीचे संचालन राहुल चोपडा यांनी केले तर उपस्थितांचे आभार भाजपा शहराध्यक्ष सुभाष कुंटेवार यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)
सेनेसोबत युती न करण्याचा निर्णय
By admin | Published: June 30, 2016 2:16 AM