शिवरूद्र प्रतिष्ठानची मागणी : निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादरवर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची आहे यात शंकाच नाही. त्यातच येथील बेरोजगारांसाठी फारसे रोजगारही उपलब्ध नाही. त्यामुळे बेरोजगारी आणि विकासाच्या बाबतीत जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना शिवरूद्र प्रतिष्ठानच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. जिल्ह्यात उच्च व तांत्रिक शिक्षणाचा पूर आला आहे. त्यामुळे सुशिक्षतांची मोठी फौज दरवर्षी जिल्ह्यातून बाहेर पडते. पण तांत्रिक रोजागाराच्या नावावर बोटावर मोजण्याइतपत कंपन्या आहेत. यामुळे शिक्षण घेताच रोजगारासाठी जिल्ह्यातील युवकांना नागपूर, पुणे आणि मुंबई ही महानगरे गाठावी लागतात. पण या शहरांमध्येही नोकरी करणे, तेथे वास्तव्य करणे सोपे नसते. त्यामुळे अनेक युवक काही वर्षांनंतर स्वजिल्ह्याची वाट धरतात. पण येथे आल्यावरही रोजगार मिळणे कठीण जात असल्याने युवकांमध्ये नैराश्याची भावना वाढत आहे. ऐतिहासिकदृष्ट्या वर्धा शहराला सर्व जगात ओळखले जाते. विनोबा भावे, महात्मा गांधी या दोन महापुरूषांचा हा जिल्हा आहे. पण ही बाब सोडली तर जिल्ह्यात काय असा प्रश्न आता युवक विचारू लागले आहे. जिल्ह्यातील शेतकरी वर्गाची स्थितीही वाईट आहे. त्यामुळे ते आपल्या मुलांना शेती करू द्यायला तयार नाही. त्यामुळे विचित्र मानसिकतेत येथील युवक भरडले जात आहे. जिल्ह्यातील युवकांपुढे काय रोजगार करावा हा प्रश्न आहे. जे युवक रोजगारासाठी बँकांमध्ये लोन घेण्यासाठी जातात त्यांनाही सहजासहजी कर्ज मिळत नाही. त्यामुळे रोजगार मार्गदर्शन शिबिराचाही युवकांना कंटाळा आला आहे. मुद्रा लोन ही योजना तर केवळ फसवी ठरत आहे. बँका या लोनसाठी नकारघंटा वाजवित आहेत. त्यामुळे जिल्ह्यात रोजगार उपलब्ध करा अन्यथा जिल्हा रोजगार व विकासाच्या बाबतीत दुष्काळग्रस्त घोषित करा कशी मागणी निवेदनात करण्यात आली. शिष्टमंडळात युवा सोशल फोरम, समता सामाजिक युवा संघटना आदी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्तेही सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी) सुशिक्षित बेरोजगारांमध्ये नैराश्याची भावनाशिक्षणाच्या दृष्टीने जिल्हा पुढारलेला आहे. सर्व प्रकारचे शिक्षण येथे उपलब्ध आहे. पण शिक्षण घेतल्यानंतर रोजगार मात्र तितक्या प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे मोठ्या शहराकडे युवकांना धाव घावी लागत आहे. त्यामुळे येथील युवकांमध्ये नैराश्याची भावना बळावली आहे. शिक्षणाचा उपयोग कुठे करावा हा प्रश्न त्यांना पडत आहे. शेतीही परवडत नसल्याने काय करावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
विकासाबाबत जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा
By admin | Published: July 07, 2016 2:18 AM