वर्धा : हिंगणघाटला जिल्हा म्हणून घोषित करावे या मुख्य मागणीसाठी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान संबंधित मागणीचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला पाठविण्यात आले.
विदर्भातील सर्वात मोठा तालुका असेच हिंगणघाट शहराकडे बघितले जाते. शिवाय या शहराची लोकसंख्या पावणे दोन लाखाच्या घरात आहे. हिंगणघाट शहराला ब्रिटीश काळापासून औद्योगिक शहर म्हणूनही ओळखले जाते. तर संपूर्ण महाराष्ट्रात हिंगणघाट शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती प्रथम क्रमांकाची आहे. हिंगणघाट शहर हे जिल्ह्याला सर्वात मोठा महसूल देणारे आहे. येथून राष्ट्रीय महामार्गही गेला असून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयही आहे. शिवाय १०० रुग्ण खाटेच्या हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाला ४०० रुग्णखाटांची मंजूरी मिळाली आहे. तर हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी लढाही दिला जात आहे.
हिंगणघाट हे समाजसेवक बाबा आमटे यांचे जन्मस्थान असून ग्रेट ट्रिग्नो मॅट्रीकल सर्वे ऑफ इंडीया जनक कर्नल विल्यम लॅम्बटन यांचे स्मृती स्थळ असून हिंगणघाटला जिल्हा घोषित करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शुक्रवारी रेटली. आंदोलनात राकाँचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, किशोर माथनकर, प्रलय तेलंग, प्रशांत घवघवे, रफिकभाई, वासुदेव गौळकर, पुंडलिक बकाने, दशरथ ठाकरे, अनिल भोंगाडे, जावेद मिर्झा, आदी सहभागी झाले होते.