प्रशांत हेलोंडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात १०० खाटांचे स्त्री रुग्णालय मंजूर होऊन १४ कोटी रुपयांच्या प्राकलनास मंजुरी देण्यात आली; पण प्रत्यक्षात ४ कोटी ५० लाख रुपयांचाच निधी प्राप्त झाला. यामुळे रुग्णालय बांधकामात अडचणी येत असल्याचे दिसते. महिला सक्षमीकरणास प्राधान्य देण्याचे धोरण शासन राबवित असून त्याचाच एक भाग म्हणून महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालयाची संकल्पना समोर आली आहे.शासनाने स्त्री रुग्णालयांच्या निर्मिमीसाठी पुढाकार घेतला. आरोग्य संचलनालयाने यास मंजुरी प्रदान केली. यासाठी १४ कोटी रुपयांचे प्राकलन तयार करण्यात आले. शासन, प्रशासनाच्या मान्यतेचे सोपस्कार पार पडल्यानंतर निविदा काढण्यात आल्या. यात नागपूर येथील डी.व्ही. पटेल अॅण्ड कंपनी यांना ११ कोटी ९० लाख २४ हजार ५८५ रुपयांचे कंत्राट देण्यात आले. १०० खाटांच्या या स्त्री रुग्णालयाचे प्रत्यक्ष बांधकाम १५ आॅक्टोबर २०१६ रोजी सुरू झाले. हे काम कंत्राटदाराला १८ महिन्यांत म्हणजे एप्रिल २०१८ पर्यंत पूर्ण करावयाचे आहे. शिवाय दोन वर्षे दोष निवारण कालावधी ठरविण्यात आला आहे. कंत्राटदार कंपनीकडून महिला रुग्णालयाचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. सध्या यातील एका इमारतीचे काम स्लॅबपर्यंत पोहोचले असून उर्वरित दोन इमारतींची कामेही प्रगतिपथावर आहेत; पण आजपर्यंत रुग्णालय बांधकामाकरिता केवळ ४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. उर्वरित निधी शासनाकडून अद्यापही देण्यात आलेला नाही.रुग्णालय बांधकामाचा संपूर्ण निधी प्राप्त झाला असता तर मुदतीत बांधकाम पूर्ण करता आले असते. शिवाय तेवढ्याच रकमेत रुग्णालय उभे राहू शकले असते; पण अद्याप निधी न आल्याने आता महिला रुग्णालयाच्या इमारतीची किंमतही वाढल्याचे सांगण्यात आले आहे. १२ कोटी रुपयांत कंत्राट दिले असले तरी प्रत्यक्षात रुग्णालयाच्या संपूर्ण बांधकामाकरिता तब्बल २० कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे. याबाबतचा वाढीव तरतुदीकरिता प्रस्तावही शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. आता उर्वरित निधी तथा वाढीव तरतूद होऊन बांधकामाला वेग कधी येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.शासनाकडून प्रशासकीय तथा अन्य मान्यता प्राप्त झाल्या असताना केवळ निधी न आल्याने रुग्णालय बांधकामाची किंमत तब्बल सहा कोटींनी वाढली आहे. १४ कोटींची मान्यता असलेल्या इमारतीला आता २० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. सध्या बांधकाम प्रगतिपथावर असले तरी शासनाकडून निधी प्राप्त न झाल्यास ते रखडणार असल्याचेच चित्र आहे. याबाबत वरिष्ठांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.आरोग्य सेवेत येणार सुसूत्रताजिल्हा सामान्य रुग्णालयात सर्वच प्रकारच्या रुग्णांवर उपचार केले जातात; पण महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय झाल्यास आरोग्य सेवेत सुसूत्रता येणार आहे. यासाठी या रुग्णालयाचे काम मुदतीत पूर्ण होणे गरजेचे आहे. आता किंमत वाढल्याने वाढीव निधीला मान्यता कधी मिळणार, यावर बांधकाम अवलंबून आहे.जिल्ह्यात महिलांकरिता स्वतंत्र १०० खाटांचे रुग्णालय बांधण्यात येत आहे. बांधकाम स्लॅबपर्यंत आले आहे. यासाठी आजपर्यंत ४.५० कोटींचा निधी आला असून आता बांधकामाची किंमत वाढली आहे. वाढीव तरतुदीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.- डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.
महिला रुग्णालय बांधकामात निधीचा खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 1:07 AM
शहरात १०० खाटांचे स्त्री रुग्णालय मंजूर होऊन १४ कोटी रुपयांच्या प्राकलनास मंजुरी देण्यात आली;
ठळक मुद्देकेवळ ४.५० कोटी प्राप्त : वर्षभरात किंमत झाली २० कोटी