वर्धा : विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी वीज क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारणे अत्यंत गरजेचे झाले आहे. यासाठी केंद्र शासनामार्फत दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्याला ५५ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. अटल सौर कृषी पंप योजनेंतर्गत राज्यातील पहिल्या सौर कृषीपंप उर्जीकरणाचा उद्घाटन कार्यक्रम कारंजा तालुक्यातील बोरगाव (ढोले) येथील देविदास रामधम यांच्या शेतात पार पडला. याप्रसंगी ना. बावनकुळे बोलत होते. पुढच्या ४० वर्षांत वर्धा जिल्ह्याला विजेची कमतरता भासणार नाही, अशा पध्दतीने वीज क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ही योजना तयार करण्यात येत आहे. यामध्ये ३३ के.व्ही. सबस्टेशन, शेतकऱ्यांना शाश्वत वीज उपलब्ध करून देण्यासाठी कृषी फीडर, भूमिगत विद्युतीकरण, गावठाण फीडर यासर्व बाबींचा समावेश असणार आहे. यामुळे सर्वांना वीज उपलब्ध होईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सर्वासाठी वीज उपलब्ध करून देण्याची शासनाची जबाबदारी आहे. यासाठी नवीन पायाभूत सुविधा निर्माण करावी लागत असून या कामाकरिता २५ हजार कोटी रुपये खर्च येणार असून याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यातील जुन्या पायाभूत सुविधाच्या दुरुस्तीसाठी १० हजार कोटी रुपये खर्च येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.(प्रतिनिधी)
दीनदयाल उपाध्याय योजनेत जिल्ह्याला ५५ कोटी
By admin | Published: September 05, 2016 12:43 AM