तहसीलदारांशी चर्चा : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे आंदोलन लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : विज्ञान शाखेत अकरावीत दिपचंद चौधरी कनिष्ठ महाविद्यालयात अतिरिक्त तुकडीची मान्यता घेवून विद्यार्थ्यांना सरसकट प्रवेश देण्यात यावा. या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने गुरुवारी आंदोलन केले. मनसे विद्यार्थी सेनेचे वर्धा जिल्हा अध्यक्ष शुभम दांडेकर यांच्या नेतृत्त्वात व मनसे जिल्हा अध्यक्ष अजय हेडावू यांच्या प्रमुख उपस्थितीत मोर्चा काढून शाळा बंद पाडण्यात आली. याबाबतीत सविस्तर चर्चेअंती सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनोने यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल असे आश्वासन आंदोलकांशी चर्चा करून दिले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने गावातून मोर्चा काढून येथे अतिरिक्त विनाअनुदानित तुकडीची त्वरीत मान्यता देण्यात यावी व गुणवत्तेची अट शिथील करून मागेल त्याला विज्ञान शाखेत प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. इयत्ता बारावीपर्यंत विज्ञान शाखेत शिक्षण घ्यावे असा कल ग्रामीण भागात दिवसेंदिवस वाढत आहे. विद्यार्थ्यांना दिपचंद चौधरी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी परिसरातील विद्यार्थ्यांची तसेच त्यांच्या पालकांची धडपड सुरू आहे. या महाविद्यालयात यंदा दहावी वर्गातून २८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. गत वर्षी या विद्यालयात १७३ विद्यार्थ्यांना अकरावी विज्ञान शाखेकरिता प्रवेश दिला होता; परंतु यावर्षी प्रवेशाचे क्षमता ६० विद्यार्थी इतकीच ठेवण्यात आली असून अनेकांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे. काही महाविद्यालयात इयत्ता अकरावी विज्ञान शाखेचे विना अनुदानित तत्वावर विज्ञान शाखेची तुकडी असूनही विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये उकळविण्यात येत आहे. ग्रामीण क्षेत्रातील गोरगरीब विद्यार्थी तेथे प्रवेश घेण्यास इच्छुक नाही; परंतु दिपचंद चौधरी कनिष्ठ महाविद्यालयात नाममात्र शुल्क घेत असल्याने तेथेच प्रवेश मिळावाकरिता विद्यार्थ्यांचे पालकही प्रयत्नशिल आहेत. यावेळी शाळा बंद आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे वर्धा जिल्हा अध्यक्ष शुभम दांडेकर, मनसे जिल्हा अध्यक्ष अजय हेडाऊ, तालुका अध्यक्ष प्रशांत झाडे, विद्यार्थी प्रतिनिधी मयुर दांडेकर, प्रतीक सुरकार, नितीन देवरे, गौरव हटवार, संकेत सुरकार, मुकुल खोडके यांच्यासह पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीपचंद विद्यालय पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 2:23 AM