पूर्वनियोजित बैठक रद्द : संतप्त दिव्यांग बांधवांची निदर्शनेलोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : नगर परिषदमध्ये आज ठरलेली पुर्वनियोजित बैठक ऐनवेळी रद्द झाली. यामुळे संतप्त अपंग बांधवानी मुख्याधिकाऱ्यांच्या खूर्चीला हार घालत त्यांच्या टेबलवर चपला व जोडे ठेवून आपला निषेध व्यक्त केला. केंद्र शासनाच्या अपंग व्यक्तींसाठी समान संधी, संरक्षण व समान कायदा १९९५ मधील तरतुदीच्या अनुषंगाने अपंगासाठी नगरपालिकेमध्ये किमान ३ टक्के निधी राखीव ठेवण्याबाबत गुरुवारी ही बैठक आयोजित होती. या बैठकीच्या अनुषंगाने हिंगणघाट शहरातील जवळजवळ शंभर दिव्यांग नियोजित वेळी पालिकेत पोहोचले. येथे विविध विषयावर चर्चा होईल अशा अपेक्षेत असलेल्या दिव्यांगांना ऐनवेळी बैठक रद्द झाल्याची माहिती मिळाली. तसेच पुढच्या बैठकीची तारीख नंतर कळविण्यात येईल असा नोटीस पालिकेच्या मुख्यदारावर लावण्यात आल्याचे दिसून आले. ही बैठक रद्द झाल्याचे कळताच ऐन रखरखत्या उन्हात बैठकीला आलेल्या दिव्यांग बांधवांचा संताप अनावर झाला. या बैठकीकरिता काही बांधव बाहेरगावाहून आले होते. यामुळे संतापलेल्या अशातच अपंग बांधवांनी त्याठिकाणी जोरदार घोषणाबाजी करीत आपला निषेध नोंदविला. यावेळी झालेल्या आंदोलनानंतर आजची बैठक घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या बैठकीची हमी मिळाल्यानंतर दिव्यांग बांधवांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी अपंग संघटनेचे राजाभाऊ पप्पनवार, संजय बोरकर, गोपाल कांबळे, कैलास आत्राम, कमलेश वैरागडे, आकाश बोकडे, सतीश भोसले यांचेसह असंख्य अपंग पुरूष व महिलांची उपस्थिती होती. या आंदोलनामुळे पालिकेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. टेबलवर ठेवल्या चपलायावेळी दिव्यांग बांधवांनी संतप्त प्रतिक्रीया देत निषेध नोंदविला. त्यांनी पालिकेच्या आवारात घोषणाबाजी केल्या. शिवाय ते एवढ्यारच थांबले नाही तर त्यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून आपला संताप व्यक्त केला. शिवाय त्यांच्या टेबलवर चपला व जोड्यांचा ढिग ठेवत मागण्या पूर्ण करण्याकरिता बैठक घेण्याची मागणी केली. नगर परिषदेने सभा रद्द झाल्यासंदर्भात मुख्याद्वारावर जो नोटीस लावला त्यावर सभेची पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल, असे नमुद केले होते. परंतु प्रशासकीय कामाच्या व्यस्ततेमुळे बैठक नाईलाजाने रद्द करावी लागली असून ती उद्या २६ दुपारी ११ वाजता आयोतिज करण्यात आली आहे. - अनिल जगताप, मुख्याधिकारी, नगर परिषद, हिंगणघाट
मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार
By admin | Published: May 26, 2017 12:49 AM